बीड : मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे काल परळीत आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मुंडे यांच्या स्वागतासाठी सात क्विंटलचा फुलांचा हार मागवण्यात आला होता. मुंडे यांच्या स्वागतासाठी हजारो लोक परळीत हजर होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी परळीकरांशी संवाद साधला. शेरोशायरीतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. समयने कुछ वक्त मेरा साथ ना दिया, मेरी काबिलीयत पर लोग शक करने लगे, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी राजकीय विरोधकांवर निशाणा साधला.
मागीलवेळी मंत्री झालो तेव्हा मिरवणुकीत एवढा वेळ गेला की भाषण करता आले नाही. माझ्या जीवनात कधीच असा प्रतिसाद मिळाला नाही इतका मोठा प्रतिसाद आज मिळतो आहे. माझ्या संकटकाळात जे लोक सोबत आणि पाठीशी होते त्या सर्वासमोर नतमस्तक होतो.मी दुसऱ्यांदा मंत्री झाल्यावर काय बोलावे? कुणाकुणाचे आभार मानावे, ऋण व्यक्त करावे हेच कळत नाही. मी इथल्या प्रत्येक व्यक्तीला एक शब्द दिला होता. तो पूर्ण केल्याचा मला अभिमान वाटतो. तो म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही करायची वेळ येील तेव्हा परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही, असं मी म्हणालो होतो. तो शब्द पूर्ण केला आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
सकाळी 9 वाजता नगरहून निघालो आणि रात्री पावणे दहा वाजता परळीत पोहोचलो. सहा महिन्यापूर्वीचा काळ माझ्या डोळ्यासमोर येतोय. अपघात झाल्यावर आपण जे प्रेम दाखवले, त्यानंतर आज परत तुमच्या डोळ्यात प्रेम दिसतंय, असं भावूक उद्गारही त्यांनी काढलं.
महाराष्ट्राच्या राजकारणात काय झालं, काय नाही झालं हे आपण पाहिलं असेल. याचे तुम्हाला काही सोयरसुतक वाटतेय का? नाही. आगामी काळात आपल्याला राज्यात आणि देशात अधिक सन्मान मिळेल. सत्ता येते आणि जाते. पण सत्ता येताना आणि जाताना काय फरक असतो ते मी पाहिले आहे, असं ते म्हणाले.
पूर्वी ज्या पक्षात होतो तेव्हा मला विधान परिषदेत जायला मिळाले. मी पहिल्यांदा विधान मंडळात गेलो ते केवळ अजितदादांमुळे. मंत्री झालोय, त्यामुळं तुमच्या अपेक्षा वाढल्यात. कार्यकर्त्याच्या अपेक्षा पूर्ण करणे फार अवघड नाही. ही तयारी पाहिल्यावर नियम पाळावा की तोडावा असे वाटते. पण समोर चॅनेलवाले आहेत. परत एकदा सभा घ्यायची आहे. संपूर्ण मंत्रिमंडळाला परत इथे आणायचे आहे. अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना परळीत आणणार. आपल्या मातीचे नाव उभ्या देशात गाजवल्या गप्प बसणार नाही, असंही ते म्हणाले.