Sharad Pawar : एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपच, शरद पवार म्हणाले, त्यांची गुजरातमध्ये व्यवस्था करणारे माझ्या परिचयाचे!
Sharad Pawar : एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजप नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याचं शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी भाजप या बंडामागे कसा आहे याचे दाखलेच दिले. अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती पाहून हे पाहून विधान केलं आहे.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामागे भाजपच असल्याचं राष्ट्रवादीचे काही नेते सांगत नसले तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या बंडामागे भाजपच कसा आहे, याचे आज दाखलेच दिले. गुजरातमध्ये आणि आसाममध्ये सत्ता कुणाची आहे हे सर्वांना माहीत आहे. गुजरातचे भाजपचे (bjp) नेते तर माझ्या परिचयाचे आहेत. ते आमदारांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी काय करत होते हेही सर्वांना माहीत आहे. त्यामुळे या बंडामागे नेमकं कोण आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, असं शरद पवार (sharad pawar) यांनी सांगितलं. पवारांनी थेट भाजपवरच आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पवारांच्या या आरोपांना भाजप कसे उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि आमदारांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे यांच्या बंडावर सविस्तर भाष्य केलं.
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजप नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याचं शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी भाजप या बंडामागे कसा आहे याचे दाखलेच दिले. अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती पाहून हे पाहून विधान केलं आहे. प्रत्यक्ष लोकांना दुसरीकडे नेणं आणि हे ऑपरेशन करणं यात एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत. अजित पवारांना स्थानिक माहिती जरूर आहे. परंतु गुजरात आणि आसामची स्थिती आम्हाला अधिक माहीत आहे. राज्याच्या बाहेरची माहिती मला आहे. मी एक उदाहरण सांगतो. शिंदेंची एक मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असं म्हटलंय. माझ्याकडे देशातील सर्व पक्षाची यादी आहे (राष्ट्रीय पक्षांची यादी काढून पवार वाचू लागेल). त्यात देशात राष्ट्रीय पक्ष कोण भाजप, मायावती, कम्युनिस्ट पार्टी सीपीआय, सीपीएम, काँग्रेस, राष्ट्रवादी ही अधिकृत यादी आहे. आता तुम्हीच सांगा सीपीआय, सीपीएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या बंडामागे हात आहे का? मग जे या यादीत नाहीत त्याचा तुम्ही विचार केला तर ते कोण आहेत हे सांगावं लागत नाही, असं शरद पवार म्हणाले.
ते अजितदादांच्या परिचयाचे नाहीत
दुसरी गोष्ट म्हणजे सुरत आणि आसामला जी व्यवस्था करणारे लोक दिसली. ती अजित पवारांच्या परिचयाची आहेत असं वाटत नाही. पण माझ्या परिचयाची आहेत. उदा. सुरतला भाजपचे राज्य अध्यक्ष पाटील होते. ते मराठी गृहस्थ आहेत. ते पार्लमेंटरी मेंबर आहेत. त्यांचा या बंडखोरांची व्यवस्था करण्यात सहभाग असेल तर अर्थ काय सांगायचा? आसाममध्ये राज्य सरकार व्यवस्था करण्यात अॅक्टिव्ह आहे. तिथलं राज्य भाजपच्या हातात आहे. त्यामुळे वस्तुस्थिती स्पष्ट होते. कोण आहे नाही हे सांगायची गरज नाही. नाव घेण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.
त्यांना इथेच यावे लागेल
त्या आमदारांना इथे यावंच लागेल. राज्यपालांपुढे यावं लागेल. किंवा विधानसभेत तरी यावं लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यावर आसाम किंवा गुजरातचे नेते त्यांना मार्गदर्शन करतील असं वाटत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
म्हणून निधीचं कारण पुढे केलं
निधी वाटपावरून आमदार नाराज आहेत, याकडे त्यांचं लक्ष वेधलं असता, त्यांनी हा आरोप फेटाळून लावला. ही वस्तुस्थिती नाही. असत्यावर आधारीत माहिती आहे. त्यांनी जो निर्णय घेतला तो पक्षांतर बंदीच्या विरोधातील आहे. त्यांच्या बंडामुळे मतदारसंघातून प्रतिक्रिया उमटेल, त्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली. भुजबळांसोबत 16 लोक शिवसेनेतून बाहेर पडले होते. निवडणुकीनंतर एक सोडला तर सर्वांचा पराभव झाला. आता आसामला गेलेल्या लोकांबाबत ही स्थिती होऊ शकते. म्हणून निधीचं कारण पुढे करण्यात आलं आहे, असा दावा त्यांनी केला.