“सभागृहात येऊन माफी मागा”, भडकलेल्या विधानसभा अध्यक्षांची मुख्य सचिवांना शिक्षा
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य सचिवांना विधीमंडळ सभागृहात येऊन जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य सचिवांना विधीमंडळ सभागृहात येऊन जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले आहेत (Action against Chief Secretory). राज्यभरातील आमदार विधीमंडळात आपले औचित्याचे मुद्दे उपस्थित करतात मात्र, त्या मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांना वेळेत उत्तरंच मिळत नाहीत. यावर नाना पटोले आज (2 मार्च) चांगलेच भडकले. यावेळी त्यांनी मुख्य सचिवांनाच थेट माफी मागण्याचे आदेश दिले.
नाना पटोले म्हणाले, “मागच्या अधिवेशनात 83 औचित्याचे मुद्दे होते. त्यापैकी फक्त 4 उत्तर पाठवली आहेत. विधिमंडळाच्या सभागृहात झालेल्या कामकाजाबाबत सचिवालयात अधिकारी दखल घेत नाहीत. मी जोपर्यंत खुर्चीत आहे तोपर्यंत माझ्या सभागृहाचा अपमान केला तर मी कारवाई करणारच.”
“तहसीलदार पण आमदारांचं ऐकत नाही, आदर करत नाही, आदेश कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. या वागणुकीला मुख्य सचिवांनाच जबाबदार धरलं जाईल. मुख्य सचिवांनी प्रशासन कसं काम करतं याकडे बघितलं पाहिजे.”
विधी मंडळातील कामकाजबाबत अध्यक्ष नाना पटोले यांनी आज गंभीर पाऊल उचलत कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट माफीचे आदेश दिले. यानंतर अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य सचिवांना इतकी शिक्षा नको अशी भूमिका घेतली. ते म्हणाले, “यापूर्वी असं कधीही घडलेलं नाही. मुख्य सचिवांना एवढी मोठी शिक्षा नको. मी शासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो.”
यावर मुख्य सचिवांनी माफ करा, आम्ही सुधारणार करु, असं आश्वासन दिलं. ते म्हणाले, “आपल्या भावना समजून घेता, माफ करा, आम्ही सुधारणा करू. पुन्हा अशी वेळ येणार नाही, यापुढे याबाबत खबरदारी घेऊ. आजपर्यंत विधिमंडळाच्या कामकाज इतिहासात अध्यक्षांनी मुख्य सचिवांना शिक्षा दिलेली नाही.”
विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर अजित पवार यांच्याशी सहमती दाखवली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ते बरोबर आहे. ही शिक्षा कठोर आहे. अधिकाऱ्यांना दालनात बोलावून समज द्या.” महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “मागील उत्तरं आली नाही. त्यामुळे आपला रोष समजू शकतो. उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनी जी विनंती केली ती आपण मान्य करावी, अशी विनंती.”
अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपली कारवाई मागे घेतली. नाना पटोले म्हणाले, “उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, विरोधी पक्षनेते यांनी निवेदनं केली आहेत. सभागृहाचे पावित्र्य ठेवलं जात नसेल, तर कडक धोरण घेणं आवश्यक आहे. आता तुम्ही सगळ्यांनी आश्वासन दिलं आहे. म्हणून मी कारवाई मागे घेतो.”
Action against Chief Secretory