परमबीर सिंह आणि सचिन वाझे भेटीमागे कोण? चौकशी व्हावी, काँग्रेस नेते अतुल लोंढे आक्रमक
चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) हे चांदिवाल कमिशनसमोर (Chandiwal Commission) चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळतेय, हे नियमाला धरुन नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, परमवीरसिंह व सचिन वाझे हे दोघेही अनेक प्रकरणात आरोपी आहेत. आणि अशा पद्धीतीने दोन आरोपीमध्ये चर्चा होणे गंभीर आहे, यामुळे चौकशीमध्ये बाधा पोहचू शकते. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना कधी घडली नाही. जर असं झालं असेल तर याची खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे. परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यामध्ये काय चर्चा झाली? त्यांच्या भेटीमागे कोण आहे ? त्यात काय कट शिजला? हे जनतेच्यासमोर आलं पाहिजे असे लोंढे म्हणाले.
सिंह आणि वाझेंमध्ये काही सेंकदाची चर्चा
चांदीवाल आयोगासमोर जाताना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये काही सेकंदांचा संवादही झाला. पण यावेळी सिंह आणि वाझे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलं नाही. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आणि त्याला वेगळं वळण मिळालं. या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आज वाझे आणि सिंह एकमेकांसमोर आले होते.
परमबीर सिंह चांदिवाल आयोगासमोर हजर
परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं होतं. अशावेळी सिंह यांच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना झाली होती. त्यानंतर बराच काळ परमबीर सिंह बेपत्ता होते. किला कोर्टानं त्यांना फरारही घोषित केलं होतं. अशातच चांदीवाल आयोगानं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. परंतु, परमबीर सिंह चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यावेळी चांदीवाल आयोगानं त्यांना दोन वेळा जामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. ते आज आयोगानं रद्द केलं आहे.
इतर बातम्या :