‘माजी खासदार’ संबोधल्याने खैरे भडकले, जलील यांच्याकडूनही चिमटा
त्यांना सतत माजी खासदार (Chandrakant Khaire Aurangabad) संबोधण्यात आल्याने त्यांनी चांगलंच सुनावलं, त्यात कळीचा मुद्दा म्हणजे याच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनीही खैरेंना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही.
औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire Aurangabad) यांना लोकसभा निवडणुकीतील पराभव अत्यंत जिव्हारी लागला होता आणि त्याची आग अजूनही तेवढीच धगधगती आहे. याचा प्रत्यय बांधकाम व्यावसायिकांची संघटना अर्थात क्रेडाईच्या (CREDAI) कार्यक्रमात आला. त्यांना सतत माजी खासदार (Chandrakant Khaire Aurangabad) संबोधण्यात आल्याने त्यांनी चांगलंच सुनावलं, त्यात कळीचा मुद्दा म्हणजे याच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनीही खैरेंना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही.
कार्यक्रमातील वक्त्यांकडून माजी खासदार असा उल्लेख करण्यात येत होता. यावर खैरे म्हणाले, “मी कार्यक्रमात आल्यापासून बघतोय माझा उल्लेख माजी खासदार म्हणून केला जातोय. काय माजी खासदार, माजी खासदाय लावलंय… मी आजही शिवसेनेचा नेता आहे आणि लोक माझ्याकडे त्यांची कामे घेऊन येतात.”
या कार्यक्रमाला चंद्रकांत खैरे, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह राजकीय पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. पण हा कार्यक्रम चंद्रकांत खैरे यांच्या भाषणामुळेच जास्त चर्चेत राहिला. खैरेंचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे अनेकांनी त्यांचा उल्लेख माजी खासदार असाच केला. पण ते त्यांना रुचलं नाही.
यावेळी बाजूलाच असलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनीही खैरेंना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. “मी खासदार झालोय, याच्यावर अजूनही काही लोकांचा विश्वासच बसत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत झाली. चंद्रकांत खैरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील यांचं, तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचंही आव्हान होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात मतांचं विभाजन झालं आणि खैरेंचा आश्चर्यकारकरित्या पराभव झाला.