MNS: औरंगाबाद मनसेला मोठे भगदाड, 53 कार्यकर्त्यांचे राजीनामे, राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर अस्वस्थता वाढली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर औरंगाबाद मनसेतील अस्वस्थता आणखीच चव्हाट्यावर आली आहे. काल सुहास दाशरथे गटातील चार कार्यकर्त्यांवर कारवाई झाल्यानंतर आज 53 कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकला.
औरंगाबादः शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (Aurangabad MNS) आज मोठा भूकंप झाला. मनसेच्या 53 कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामा दिलाय. बुधवारी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी केल्यानंतर अचानकपणे इतरही कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज गुरुवारी औरंगाबाद मनसेतून 53 कार्यकर्ते बाहेर पडले आहेत. स्थानिक गटबाजीमुळे औरंगाबादमधील मनसेत आधीच एकजूट पहायला मिळाली नव्हती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कारवायांमुळे हा पक्ष अधिकच ढेपाळताना दिसतोय.
53 कार्यकर्त्यांचा मनसेला रामराम
गुरुवारी 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील 53 कार्यकर्त्यांनी एकाच दिवशी राजीनामा दिला. यामुळे पक्षाला मोठे भगदाड पडले आहे. यापूर्वी बुधवारी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुहास दाशरथे गटातील चार कार्त्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचे पत्र दिले होते. हे कार्यकर्ते स्थानिक माध्यमे आणि समाज माध्यमांवर पक्षाची आणि पदाधिकाऱ्यांची बदनामी करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे यापुढे या कार्यकर्त्यांचा आणि पक्षाचा काहीही संबंध नाही, असे पक्षाने त्या पत्रातून जाहीर केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 53 कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे मनसेचे बळ खच्ची होत असल्याची स्थिती आहे.
राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर अस्वस्थता
14 डिसेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात मराठवाड्यातील सर्व मनसे पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील पक्ष कार्यकारिणीत राज ठाकरेंनी मोठे बदल केले. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून मनसेत आलेल्या सुहास दाशरथे यांच्याकडील जिल्हाध्यक्ष पद काढून घेतले आणि हे पद सुमित खांबेकर यांच्याकडे दिले. त्यामुळे सुहास दाशरथे प्रचंड नाराज होते. ही अस्वस्थता त्यांनी टीव्ही9 च्या प्रतिनिधींशी एका मुलाखतीत बोलून दाखवली होती. माझं, असं काय चुकलं? असा सवाल त्यांनी राज ठाकरे यांना केला होता. त्यानंतर सुहास दाशरथे गटातील कार्यकर्ते पक्षाची बदनामी करत आहेत, असा ठपका ठेवत चार कार्यकर्त्यांना मनसेनं घरचा रस्ता दाखवला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून अधिक ताकदीनं मोर्चेबांधणी सुरु आहे. मात्र मनसेची स्थिती काहीशी वेगळी आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर औरंगाबाद मनसेत प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. याचा परिणाम निश्चितच महापालिका निवडणुकीत दिसून येतील, हे साहजिक आहे.
इतर बातम्या-