आधी अशोक चव्हाणांनी धूळ चारली, आता गोरठेकरांना कट्टर समर्थकांचं काँग्रेसमधून आव्हान
काँग्रेस उमेदवार संदीप कवळे यांचे वडील मारोती कवळे हे दिग्गज नेते बापूसाहेब गोरठेकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. (Bapusaheb Gorthekar Nanded Bank Election )
नांदेड : नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत (Nanded District Bank Election) एकेकाळचे कट्टर समर्थक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजप नेते बापूसाहेब (श्रीनिवास) गोरठेकर (Bapusaheb Gorthekar) यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या कवळे पितापुत्रांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या पाठिंब्यावर भाजपचा धुव्वा उडवण्याचा निर्धार कवळेंनी व्यक्त केला आहे. याआधी विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांनी गोरठेकरांना पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे गोरठेकर पुन्हा काँग्रेसकडून पराभूत होणार, की पराभवाचा वचपा काढणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Bapusaheb Gorthekar Supporter Maroti Kawle Nanded District Bank Election with Ashok Chavan)
गोरठेकरांचे कोणे एके काळचे समर्थक कवळे पितापुत्र
नांदेड जिल्हा बँकेच्या उमरी तालुका मतदारसंघात भाजपकडून कैलाश देशमुख रिंगणात उतरले आहेत. तर काँग्रेसकडून संदीप कवळे निवडणुकीच्या मैदानात आहेत. संदीप कवळे यांचे वडील मारोती कवळे हे दिग्गज नेते बापूसाहेब गोरठेकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.
गेल्या महिन्यात मारोती कवळे यांनी पुत्र संदीप कवळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला आणि काँग्रेसचा झेंडा हाती धरला. त्यामुळे संबंध नांदेड जिल्ह्याचे लक्ष बँकेच्या उमरी मतदारसंघ निवडणुकीकडे लागलं आहे.
कोण आहेत मारोती कवळे?
वंचित बहुजन आघाडीचे विधानसभेचे उमेदवार राहिलेले मारोती कवळे गुरुजी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उमरी तालुक्यातील एक प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या कवळे गुरुजींच्या काँग्रेस प्रवेशाने नायगांव विधानसभा मतदारसंघातील चित्रच बदलणार आहे.
राष्ट्रवादी सोडून वंचितमध्ये प्रवेश
कवळे गुरुजी या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले मारोती कवळे हे एक यशस्वी उद्योजक आहेत. पतपेढीच्या माध्यमांतून कवळे गुरुजींनी हजारो शेतकऱ्यांना आर्थिक हाथभर लावत पायावर उभे केलंय. दूध, गुळाच्या व्यवसायात त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आपल्याशी जोडलेलं आहे. माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे कट्टर समर्थक असलेले कवळे गुरुजी त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते.
गोरठेकरांची उमरी तालुक्यावर पकड
दरम्यान, भाजप नेते बापूसाहेब गोरठेकर यांची उमरी तालुक्यात मजबूत पकड आहे, मात्र मंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठिंब्यावर आपण ही निवडणूक जिंकू असा विश्वास कवळे गटाला वाटतो.
कोण आहेत बापूसाहेब गोरठेकर?
बापूसाहेब गोरठेकर यांनी जुलै 2019 मध्ये राष्ट्रवादीला अलविदा केला
त्यावेळी गोरठेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष होते
बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि तितकेच ताकदवान नेते आहेत.
जुन्या पिढीतील शब्द पाळण्याचा त्यांचा गुण आजही कायम आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या विलक्षण मोठी आहे.
भाजपप्रवेशानंतर बापूसाहेब गोरठेकर यांना भाजपकडून भोकर विधानसभा मतदारसंघातून तिकीट
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाणांशी गोरठेकरांचा सामना
जवळपास 97 हजारांच्या मताधिक्याने अशोक चव्हाण विजयी, गोरेठेकरांचा पराभव
चिखलीकरही मैदानात
दुसरीकडे, नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर सर्व प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्याच्या सुरुवातीला दिला होता. या आदेशानंतर खासदार चिखलीकर यांनी बँकेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (Bapusaheb Gorthekar Supporter Maroti Kawle Nanded District Bank Election with Ashok Chavan)
सकाळी दिलासा दुपारी अर्ज
नांदेड जिल्हा बँकेच्या मतदान यादीतून चिखलीकर यांचे नाव हटवावे, अशी मागणी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याबाबत दोन मार्चच्या सकाळी चिखलीकर यांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून चिखलीकर यांनी त्याच दिवशी दुपारी आपला उमेदवारी अर्ज भरला होता.
जिल्हा बँक निवडणुकीत चुरस
या निवडणुकीत जे सोबत येतील त्यांना घेऊन आपण मैदानात उतरणार असल्याचे चिखलीकर यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे आता नांदेडच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने चुरस निर्माण होणार आहे. न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असल्याची प्रतिक्रिया खासदार चिखलीकर यांनी दिली होती.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभव केला होता. अशोक चव्हाण यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे चिखलीकर हे निकटवर्तीय होते, मात्र अशोक चव्हाणांचे ते विरोधक झाले.
संबंधित बातम्या :
सकाळी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, दुपारी खासदार चिखलीकरांची नांदेड जिल्हा बँकेसाठी उमेदवारी
आता जिल्हा बँकेमध्येही महाविकास आघाडी पॅटर्न, मात्र, ‘या’ जिल्ह्यात काँग्रेस मोठा भाऊ
अशोक चव्हाणांना सोळा नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाचे वेध?
(Bapusaheb Gorthekar Supporter Maroti Kawle Nanded District Bank Election with Ashok Chavan)