बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का, विजयबापू शिवतारेंच्या नेतृत्वात मविआचे अनेक नेते शिंदे गटात
माजी मंत्री विजयबापू शिवतारे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर, समन्वयक आशिष कुलकर्णी यांच्या नेतृत्वात हा सोहळा पार पडला.
गिरीश गायकवाड, पुणेः प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बारामतीत (Baramati) राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणारी घडामोड समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याला खिंडार पडल्याचं चित्र आहे. माजी राज्यमंत्री विजयबाप्पू शिवतारे यांच्या नेतृत्वात बारामती लोकसभा इंदापूर तालुका, करमाळा सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना गटातील असंख्य पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बारामती लोकसभा मतदार संघ आगामी निवडणुकांमध्ये सर्वात हॉट सीट बनलेला आहे. अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेला हा मतदार संघ कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायचा, असा चंग भाजपने बांधला आहे.
शिंदे गटात कोण कोण आलं?
पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
यात करमाळा विधानसभेचे माजी आमदार नारायण आबा पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव अरडे, वरवंटे बुद्रुकचे माजी सरपंच नामदेव बनकर, देविदास भोंग, वैभव जामदार,दौंड मधील धनगर समाजाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सचिव पांडुरंग मेरगळ विजय मदने सहकार सेना जिल्हा संघटक सोलापूर , आंनद यादव,सहकार सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते अरविंद बगाडे, अंकुश घनवट, डॉ. विशाल खळदकर, अशोक फडतरे, सोमनाथ माकर, दीपक भांडवळकर यांचा यात समावेश होता. या सगळ्यांचे पक्षात स्वागत करून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी मंत्री विजयबापू शिवतारे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर, समन्वयक आशिष कुलकर्णी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.