बारामतीचं निमंत्रण निलेश राणे स्वीकारणार? अजित पवार समर्थक आक्रमक
बारामतीचा विकास आणि ग्रामपंचायत सदस्यांवरुन निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावरुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निलेश राणेंना थेट बारामतीला येण्याचं निमंत्रण दिलं आहे.
बारामती: भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामतीच्या विकासावरुन टीका केलीय. त्यानंतर आता बारामती राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निलेश राणे यांना जाहीर निमंत्रणच देऊ केलंय. अजितदादांनी बारामतीत केलेली कामं आणि ग्रामपंचायत सदस्य पाहायला बारामतीला या, असं आव्हान राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निलेश राणे यांना दिलं आहे.(NCP Youth Congress challenges Nilesh Rane)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुमचे लहान बंधू यांनीही बारामतीतील कामांचं कौतुक करतात. त्यांच्याकडून माहिती घेऊन मगच बरळत चला, अशा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी निलेश राणेंना दिलाय. बारामतीचा विकास आणि ग्रामपंचायत सदस्यांवरुन निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती.
निलेश राणेंचं अजितदादांवर शरसंधान
अजित पवार यांची स्वतःची काहीही ताकद नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे त्यांना किंमत आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली होती. तसेच अजित पवार यांनी बाता मारु नये, ते स्वतःच्या ताकदीवर साधा एक ग्रामपंचायत सदस्यही निवडून आणू शकत नाही, असा हल्लाबोलही निलेश राणे यांनी केला आहे.
“अजित पवार यांची स्वतःची ताकद काहीही नाही. बारामतीत जी ताकद आहे ती शरद पवार यांची आहे. शरद पवार यांनी बारामतीत ताकद निर्माण केली आणि टिकवली. अजूनही शरद पवार यांचं तिथं लहानलहान गोष्टींवर लक्ष असतं, त्यांचा पहारा असतो. अजित पवार यांनी त्यातील काहीही केलेलं नाही. त्यामुळे मी निवडून देतो असं श्रेय ते घेऊ शकत नाही. ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात अजित पवारांमुळे निवडून आला असा एकही आमदार नाही. त्यामुळे अजित पवार यांनी मोठमोठ्या बाता करु नये.”
महाराष्ट्र ‘ते’ वक्तव्य विसरला नाही- राणे
“अजित पवार यांनी घोटाळे, सिंचन, बँका, घाणेरडी वक्तव्यं असं जे चित्र महाराष्ट्राला दाखवलं आहे ते महाराष्ट्र विसरलेला नाही. ते 5 वर्ष गप्प राहून मंत्रिपद उपभोगलं असतं तर काही वाटलं नसतं. अजित पवार स्वतःच्या ताकदीवर एक साधा ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही,” अशी टीका निलेश राणेंनी केली.
संबंधित बातम्या:
अजित पवारांनी बाता मारु नये, ते एक ग्रामपंचायत सदस्यही निवडून आणू शकत नाही : निलेश राणे
NCP Youth Congress challenges Nilesh Rane