कॅबिनेट बैठकीपूर्वी शिवसेना आमदारांना गेटवर रोखलं, अनेक आमदार फूटपाथवर
राज्य मंत्रिमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक होत आहे. मात्र या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या आमदारांना पोलिसांनी गेटवर अडवण्यात आलं. त्यामुळे सेनेचे काही आमदार संतप्त झाले.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची (cabinet meeting) आज सह्याद्री अतिथीगृहात (sahyadri guest house) बैठक होत आहे. मात्र या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या आमदारांना पोलिसांनी गेटवर अडवण्यात आलं. त्यामुळे सेनेचे काही आमदार संतप्त झाले. सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ बैठक होत आहे. आमदारांसोबत असलेल्या सहकाऱ्यांकडून काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सुरक्षा रक्षकांकडून ही खबरदारी घेतली जाते. मात्र सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना रोखल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली.
कोल्हापूरचे शिवसेना आमदार चंद्रदीप नरके, उल्हास पाटील यांना रोखलं. याशिवाय अन्य पक्षाचेही आमदार गेटवर, फूटपाथवर उभे राहिले. आजच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील महापुरामुळे झालेल्या नुकसानीची चर्चा होण्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र केवळ शिवसेना आमदारांनाच जाणीवपूर्वक अडवलं जातंय का असा सवाल उपस्थित होत आहे.
कॅबिनेटच्या बैठकीला हजर राहता येत नाही, पण या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा हक्क आम्हाला आहे, असं शिवसेना आमदारांचं म्हणणं आहे.
अनेक आमदार मतदारसंघातील कामासंदर्भात भेटण्यासाठी आले. आमदार फुटपाथवर, गेटजवळ उभे राहिले. आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं. आमदारांना वेटिंग रुममध्ये बसण्यास दिलं जाऊ शकतं, मात्र आमदारांना गेटवर रोखणं चुकीचं आहे, असं आमदारांनी सांगितलं.
कोल्हापूरचे शिवेसना आमदार चंद्रदीप नरके यांची प्रतिक्रिया
“महापुरामुळे शेतकरी नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलावलं आहे. त्यानुसार मी आणि आमदार उल्हास पाटील आलो आहे. कॅबिनेट बैठकीनंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत”, असं आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं.
आम्हाला वेळ दिला आहे, आमच्या विषयाचं गांभीर्य वेगळं आहे, त्यामुळे सर्व काही सुरळीत होईल. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना आमदारांना रोखल्याची माहिती नसावी. प्रोटोकॉलमुळे आमदारांना अडवलं असेल, असंही चंद्रदीप नरके म्हणाले.
सध्या शिक्षक आंदोलन सुरु आहे. त्यामुळे अनेक आंदोलक कॅबिनेट बैठकीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करु शकतात, त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी खबरदारी घेतली आहे. पण यावेळी आमदारांनाही रोखण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.