संजय राऊत यांचं बोलणं म्हणजे निव्वळ बडबड!; भाजपचं टीकास्त्र
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला आता शिंदेगटाने उत्तर दिलं आहे. राऊतांच्या बोलण्यावर टीका करण्यात आली आहे.
औरंगाबाद : ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या भाषणाच्या शैलीवर टीका केली आहे. त्यावर आता भाजपकडून राऊतांवर टीका करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी संजय राऊत यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे.
संजय राऊत यांचं बोलणं म्हणजे निव्वळ बडबड आहे, अशा शब्दात भागवत कराड यांनी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणजे विटलेली भाजी आणि कडी आहेत. भाजी विटली की ती टाकूनच द्यावी लागते. तसं राऊतांचं झालं आहे, असं भागवत कराड म्हणालेत.
संजय राऊत यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नसतं. त्यामुळे त्यांचं बोलणं सिरियसली घेण्याची गरज नाही, असं म्हणत भागवत कराड यांनी संजय राऊत यांच्या बोलण्यवर टीकास्त्र डागलंय.
राऊत काय म्हणालेत?
19 ते 29 डिसेंबर हिवाळी अधिवेशन पार पडलं. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात जे भाषण केलं. त्यावर राऊतांनी टीका केलीय.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं तर ते एखादं गल्लीतलं भाषण वाटतं”, अशा शब्दात राऊतांनी शिंदेंच्या भाषणावर टीका केली आहे.
विधानसभेतील संबोधन हे मुख्यमंत्र्यांचं वैयक्तिक भाषण नाहीये. मुख्यमंत्र्यांना एक संधी मिळते महाराष्ट्राचा विकासवरती बोलण्यासाठी. तिथे राज्यातील प्रश्नांवर विकासावरच बोलणं अपेक्षित आहे. जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याची संधी मिळते. पण मुख्यमंत्रीच जर वैयक्तिक मुद्द्यांवर भाषण द्यायला लागले तर राज्याच्या विकासाला कोण बोलणार?, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय.
रस्त्यावरची भाषा असली तर आम्हीही रस्त्यावरती उत्तर देऊ. आपण विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलताय, मंत्री म्हणून बोलताय भान ठेवून बोललं पाहिजे, असं म्हणत राऊत यांनी शिंदेंच्या भाषणावर टीका केली आहे.
संजय राऊत यांच्या या टीकेला आता भागवत कराड यांनी उत्तर दिलं आहे. कराड यांच्याकडून राऊतांच्या भाषणाच्या शैलीवर टीका करण्यात आली आहे.