भारत जोडो यात्रा 2 दिवस स्थगित, राहुल गांधी हेलिकॉप्टरने कुठे निघाले?
औरंगाबादमध्ये सोमवारी रात्री हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे ते मुक्कामी असतील. मंगळवारी सकाळी 7 वाजता ते भारत जोडो यात्रेसाठी निघतील.
बुलढाणाः भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra) असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांची यात्रा खरं तर पायी आहे. महाराष्ट्रात मागील 15 दिवसांपासून पदयात्रेद्वारे फिरणारे राहुल गांधी (Rahul Gandhi) आज अचानक हेलिकॉप्टरमध्ये बसलेले दिसून आले. गुजरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी गुजरातमध्ये (Gujrat) दोन सभा घेण्यासाठी जाणार आहेत. यासाठी भारत जोडो यात्रा दोन दिवसांकरिता स्थगित करण्यात आली आहे.
यात्रेचा सध्या मुक्का कुठे?
खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर निमखेडी फाटा येथे दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेली आहे. या ठिकाणाहून राहुल गांधी हेलिकॉप्टरने औरंगाबाद आणि त्यानंतर चार्टर्ड विमानाने ते गुजरात निवडणूक दौऱ्यावर जात आहेत.
राहुल गांधींचा आजचा दौरा कसा?
भारत जोडो यात्रेचा चमू निमखडी फाटा येथेच मुक्कामी असेल. राहुल गांधी मात्र हेलिकॉप्टरने सुरुवातीला औरंगाबाद व तेथून विमानाने सुरत व राजकोट येथील निवडणूक प्रचार सभेला संबोधित करून परत औरंगाबाद येथे येणार आहेत.
सोमवारी रात्री औरंगाबादेत, नंतर कुठे?
औरंगाबादमधून राहुल गांधी दुपारी एका चार्टर्ड विमानाने गुजरातच्या दिशेने रवाना होतील. तेथे अनावल, सूरत तसेच राजकोट येथे राहुल गांधींच्या दोन सभा होणार आहेत. संध्याकाळी ते पुन्हा औरंगाबाद विमानतळावर दाखल होतील.
औरंगाबादमध्ये रात्री हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे ते मुक्कामी असतील. मंगळवारी सकाळी 7 वाजता ते भारत जोडो यात्रेसाठी निघतील. निमखेडी येथील ताफ्याला घेऊन ते मध्य प्रदेशच्या दिशेने जातील.
सोमवारी रात्री सूरत येथून आल्यानंतर राहुल गांधी विमानकळावरून थेट मुक्कामासाठी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे जातील. रात्री त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी औरंगाबादेत मोठी तयारी करण्यात आली आहे. मात्र यानंतर भेटीगाठीचे कोणतेही नियोजन नसल्याची माहिती, काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी दिली.