BJP vs Shivsena : ‘ज्यांनी विश्वासघात केला त्यांना आम्ही तोडलं, महाराष्ट्रात शिवसेनेनं परिणाम भोगले’, शिवसेना फोडल्याबाबत भाजप नेत्याचं पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य!
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावाही केला. या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे. अशावेळी बिहार भाजपचे नेते सुशील मोदी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना फुटीबाबत मोठं वक्तव्य केलंय.
मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मात्र, शिंदे यांच्या बंडानं शिवसेना दुभंगल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. दुसरीकडे बिहारमध्येही मंगळवारी मोठा राजकीय भूकंप झालाय. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबत काडीमोड घेत पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत घरोबा केलाय. नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावाही केला. या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे. अशावेळी बिहार भाजपचे नेते सुशील मोदी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना फुटीबाबत मोठं वक्तव्य केलंय.
नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलात जो मान मिळणार नाही तो त्यांना भाजपसोबत असताना मिळाला होता. जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं. त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न आम्ही कधीही केला नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडलं. महाराष्ट्रात शिवसेनेनं आमच्यासोबत विश्वासघात केला आणि त्याचे परिणाम ते आज भोगत आहेत, अशा शब्दात बिहारमधील भाजप नेते सुशील मोदी यांनी शिवसेना फोडल्याबाबत वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर पहिल्यांदाच एखाद्या भाजप नेत्यानं असं स्पष्ट वक्तव्य केलंय. सुशील मोदी यांच्या या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ उठण्याची शक्यता नाकारता येत नाही.
He (Nitish Kumar) won’t get that respect with RJD that he got while being with BJP. We made him CM despite having more seats & never tried to break his party. We broke only those who betrayed us. In Maharashtra, Shiv Sena betrayed us & faced consequences: BJP RS MP Sushil Modi pic.twitter.com/8fBexF7esc
— ANI (@ANI) August 9, 2022
बिहारमध्ये नव्या सरकारचा उद्या शपथविधी
नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने भाजपसोबतची युती तोडली. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. इतकंच नाही तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनता दल आणि अन्य सहा पक्षांसोबत महाआघाडी करत नवं सरकार स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यानुसार नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी राजभवनावर जात राज्यपालांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. त्यावेळी 164 आमदारांच्या समर्थनाचं पत्रही नितीश कुमार यांनी राज्यपालांना दिलं. त्यानुसार आता बिहारमध्ये जदयू, राजद, काँग्रेस आणि अन्य स्थानिक पक्षांना सोबत घेऊन उद्या सरकार स्थापन होणार आहे. उद्या (10 ऑगस्ट) दुपारी 2 वाजता नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.
#UPDATE | The swearing-in ceremony of Chief Minister and Deputy Chief Minister will be held tomorrow at 2 pm at Raj Bhavan: RJD#Bihar https://t.co/QUEfXC94gs pic.twitter.com/lycTpj7GNW
— ANI (@ANI) August 9, 2022