Bihar | बिहार राजदमधलं त्रिकुट, ज्यांची तेजस्वी यादवांना खंबीर साथ, नितीश कुमारांसोबत सत्तेची चूल मांडण्यात यशस्वी, कोण आहेत ते 3 नेते?
बिहारमधील राजकीय नाट्यात तेजस्वी यादव यांचे सर्वात निकटवर्तीय आणि सल्लागार संजय यादव यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरल्याचं म्हटलं जातंय. संजय यादव हे मूळचे हरियाणाचे.
पाटणाः बिहारमध्ये एनडीएमधून (NDA)बाहेर पडण्याचा निर्णय घेत नितीश कुमारांनी वेगळी चूल मांडण्याचा यशस्वी प्रयोग केला. राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्यासोबत त्यांनी सरकारही स्थापन केलं. या संपूर्ण प्रक्रियेत नितीश कुमारांना (Nitish Kumar) साथ देण्याचा निर्णय तेजस्वी यादव यांनी घेतला. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे बिहारमधील संपूर्ण राजकीय नाट्यातील प्रत्येक निर्णय लालूंचे पुत्र तेजस्वी यादव यांनीच घेतला. यात राजदमधील तीन प्रभावी आणि अनुभवी नेत्यांनी त्यांना भक्कम साथ दिली. सरकार स्थापनेपासून मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी तेजस्वी यादवांना दिलेला सल्ला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेला. याच बळावर आज तेजस्वी यादवांनी बिहारच्या सरकारमध्ये स्थान मिळवल्याचं म्हटलं जातंय.
कोण आहेत 3 नेते?
बिहारमधील राजकीय नाट्यात तेजस्वी यादव यांचे सर्वात निकटवर्तीय आणि सल्लागार संजय यादव यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरल्याचं म्हटलं जातंय. संजय यादव हे मूळचे हरियाणाचे. 2015 पासून ते तेजस्वी यादवांसोबत आहेत. जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून नितीश कुमारांची तेजस्वी यादव यांची पहिली भेट झाली, तेव्हा संजय यादव सोबत होते, असे म्हटले जाते. या चर्चेचा मसूदाही यादव यांनी तयार केला होता, असं म्हटलं जातंय. यादव यांच्यासोबतच प्रोफेसर मनोज झा आणि विद्यमान सरकारमधील मंत्री आलोक मेहता यांचीही तेजस्वींना खंबीर साथ असल्याचे बोलले जात आहे. सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत नितीश कुमार यांच्यासोबत पुढील चर्चा काय करायची, तसेच या गोष्टींत गुप्तता कशी पाळायची, ही सर्व रणनीती मनोज झा, संजय यादव आणि आलोक मेहता यांनी पार पाडल्याचं बिहारमधील सूत्रांनी सांगितलंय.
राजदची संपूर्ण धुरा तेजस्वी यादवांवर
बिहारमध्ये नितीश कुमार आणि एनडीएचं सरकार पडण्याच्या एक दिवस आधीच पत्रकार राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांच्याकडे प्रश्न विचारण्यासाठी गेले. यावेळी तेजस्वी यादवांनीच पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देत राजद आणि जदयू दरम्यानचे सर्व मतभेद दूर झाल्याचे स्पष्ट सांगितले. महाआघाडी होण्यापूर्वी तेजस्वी यादवांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांनाही माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास मनाई केली होती. निकटवर्तीयांच्या सल्ल्यानेच ते एकानंतर एक निर्णय घेत राहिले. यावेळी सरकार स्थापनेत तेजस्वी यादवांनी कुटुंबातील लोकांच्या सल्ल्याऐवजी आलोक मेहता, मनोज झा यांचेच मार्गदर्शन घेतले. लालू प्रसाद यादवांचेही हे निकटवर्तीय होते, असे म्हटले जाते. विशेष म्हणजे आलोक मेहता यांची बहीण सुहेली मेहता या नितीश कुमारांसोबत जदयूमध्ये गेल्या होत्या. मात्र तेव्हा अशोक मेहता यांनी लालू प्रसाद यादवांना साथ दिली. अशा अनेक प्रसंगांनंतर तेजस्वी यादवांचा या तिघांवरील विश्वास वाढत गेला. याच त्रिकुटाच्या बळावर तेजस्वी यादव सध्या बिहारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर आहेत. लालू प्रसाद यादवांच्या गैरहजेरीतही राजकारणात भक्कम स्थानी आहेत. त्यामुळे आगामी काळात बिहारमध्ये या त्रिकुटाच्या बळावरच राजद अधिक मजबूत स्थितीत असेल, ही शक्यता नाकारता येत नाही.