Bihar | बिहार सत्तांतराचे राष्ट्रीय पडसाद, नितीश कुमारांना युपीएचे संयोजक पद मिळणार? शरद पवारांसाठी धोक्याची घंटा?
युपीएमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रभावी नेते मानले जातात. आता नितीश कुमारांवर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु असल्यामुळे शरद पवारांसाठी हा मोठा धक्का समजला जातोय.
नवी दिल्लीः एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) विरोधातील चेहरा म्हणून चर्चेत असलेल्या नितीश कुमारांनी (Nitish Kumar) बिहारमध्ये भाजपला (Bihar BJP) मोठा शह दिलाय.मागील दोन दिवसांपासून बिहारच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याच जदयू पक्षातील आरपी सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमारांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजद, काँग्रेस, डावे आणि अपक्ष आमदारांचे संख्याबळ जमवून पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा दावा सांगितला. नितीश कुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची ८ व्यांदा शपथ घेतील. महाआघाडीच्या या सरकारमध्ये राजदचे तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. बिहारमध्ये या राजकीय घडामोडी सुरु असतानाच याचे राष्ट्रीय पडसादही उमटत आहे. बिहारमध्ये नितीश कुमार काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष बनवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपविरोधात लढण्यासाठी नितीश कुमारांवर युपीएअंतर्गत काँग्रेसकडून मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. युपीएचे संयोजक पद नितीश कुमारांना मिळेल, असे बोलले जात आहे. एकूणच बिहारच्या राजकीय नाट्यात नितीश कुमारांचा विजय होताना दिसतोय तर राष्ट्रीय पातळीवरही त्यांना याचा फायदा होईल, असे म्हटले जात आहे.
आज नितीश कुमारांचा शपथविधी
मंगळवारी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएतून बाहेर पडत नितीश कुमारांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यात 8 व्यांदा मुख्यमंत्री होण्याचा दावा केला. आज दुपारी नितीश कुमार मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी मंगळवारी राजदच्या नेतृत्वात महाआघाडीसंबंधीची बैठक झाली. या बैठकीला बिहारमधील डावे आणि काँग्रेसचे नेतेही हजर होते. तर नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाचे खासदार तसेच आमदारांचीही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यात नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांना मुख्यमत्री म्हणून समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आला. बिहारच्या विधानसभेत सध्या 242 सदस्य असून नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी महाआघाडी अंतर्गत 164 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा राज्यपालांकडे केला. बहुमत मिळण्यासाठीचा जादुई आकडा 122 हा आहे.
Nitish Kumar to take oath as Bihar CM for 8th time today
Read @ANI Story | https://t.co/Zf0dujul3a#BiharPolitics #BiharPoliticalCrisis #NitishKumar #JDU_RJD #BJP #Bihar pic.twitter.com/sEyHaIB4kn
— ANI Digital (@ani_digital) August 10, 2022
काँग्रेसकडून मोठी जबाबदारी?
पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील एक प्रबळ चेहरा म्हणून नितीश कुमारांकडे पाहिलं जातं. त्यातच आता बिहारमधील मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये नितीश कुमारांनी भाजपच्या राजकारणाला मात देत पुन्हा एकदा सत्ता काबीज केल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर युपीए अंतर्गत काँग्रेसकडून नितीश कुमारांना मोठी जबाबदारी देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे एनडीएतून बाहेर पडल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात नितीश कुमार यांचे वर्चस्व वाढणार असल्याचे चित्र आहे. आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही नितीश कुमार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांची संयोजक पदी निवड झाल्यानंतर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण युपीएमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रभावी नेते मानले जातात. आता नितीश कुमारांवर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु असल्यामुळे शरद पवारांसाठी हा मोठा धक्का समजला जातोय.