राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपची मोठी खेळी, निवडणुकीत हा तगडा उमेदवार देणार टक्कर ?
भाजपसोबत आमचे मतभेद आहेत. पण, जे एका प्रायोजित चॅनेलला भारताच्या संस्थांपेक्षा वर ठेवून सार्वभौमत्वाचा अवमान करत आहेत त्यांना आपला विरोध आहे, असे त्यांनी ट्विट लिहिले होते.
नवी दिल्ली : देशात भाजप पक्ष स्थापना दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करत आहे. त्याचवेळी देशात सर्वाधिक वेळा राज्य केलेल्या काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व गेल्यामुळे उदासीनतेचे वातावरण आहे. अशातच आता भाजपने काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप तगडा उमेदवार देण्याची तयारी करत आहे. हा उमेदवार माजी संरक्षण मंत्री यांचा मुलगा असून राहुल गांधी यांचा एके काळचा अत्यंत जवळचा सहकारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने एक डॉक्युमेंटरी ( India: the Modi question ) बनविली होती. त्याला केंद्र सरकारने बंदी घातली. यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यावेळी माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांनी काँग्रेस विरोधात भूमिका घेतली होती. भाजपसोबत आमचे मतभेद आहेत. पण, जे एका प्रायोजित चॅनेलला भारताच्या संस्थांपेक्षा वर ठेवून सार्वभौमत्वाचा अवमान करत आहेत त्यांना आपला विरोध आहे, असे त्यांनी ट्विट लिहिले होते.
अनिल अँटोनी यांच्या या ट्विटवरून त्यांना ट्रोल करण्यात आले. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची घोषणा केली. यामागचे कारण देताना त्यांनी लिहिले की, मी केलेले ट्विट काढून टाकण्यासाठी दबाबाव आणला जात होता. त्यासाठी अनेकांचे कॉल आले. फेसबुकवरही तेच झाले. या मुद्द्याला पाठिंबा दिल्याबद्दल शशी थरूर यांनी पाठिंबा दिला यासाठी त्याचे आभार मानले होते.
काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
त्याचवेळी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत काँग्रेस नेतृत्वाला फक्त चाटू आणि चमचे लोकच आवडतात. प्रश्न न विचारता काम करणारेच त्यांना हवे आहेत. खुशामत करणे हेच एकमेव गुणवत्तेचे माप बनले आहे, अशी टीका अनिल अँटोनी यांनी केली होती.
अनिल अँटोनी यांनी काँग्रेस सोडल्यापासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी भाजप स्थापना दिनाचा मुहूर्त साधत दिल्लीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि व्ही मुरलीधरन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. यामुळे अनिल अँटोनी यांना भाजप राहुल गांधी यांच्याविरोधात वायनाड मधून लोकसभेची उमेदवारी देणार का अशी चर्चा सुरु आहे.
राहुल गांधी यांच्या विजयात महत्वाची भूमिका
राहुल गांधी यांनी वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढविली. त्याच्या विजयात अनिल अँटोनी यांची भूमिका महत्वाची होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची डिजिटल वॉर रूम तयार करण्यासोबतच त्यांनी राहुल गांधींसाठी वायनाड लोकसभा मतदारसंघाचे सोशल मीडिया हँडलही हाताळले होते.
अनिल अँटोनी यशस्वी उद्योजक
पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वी ते केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे डिजिटल मीडिया, एआयसीसीच्या सोशल मीडिया, डिजिटल कम्युनिकेशन सेलचे निमंत्रक होते. USA च्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवीधर असलेले अनिल अँटोनी एक यशस्वी उद्योजकही आहेत.
सोनिया गांधी यांचे समर्थक वडील ए. के. अँटोनी
अनिल अँटोनी याचे वडील ए. के. अँटोनी हे सोनिया गांधी यांचे समर्थक आहेत. त्यांनी तीन वेळा त्यांनी केरळचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. तसेच, 20 वर्षे काँग्रेसचे राज्यसभा सदस्य होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये ८ वर्षे संरक्षण मंत्री होते. सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन कृती समितीचे अध्यक्ष असून काँग्रेस कार्यकारिणी, काँग्रेस कोअर ग्रुप आणि केंद्रीय निवडणूक समितीचेही ते सदस्य आहेत.