शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याआधीच शिवसेनेकडून बॅनरबाजी, औरंगाबादेत भाजप वि. शिवसेना
राज्यातील वेगवेगळ्या शहरांसह औरंगाबाद शहरातही शिवसेनेने कर्जमाफीची मोठ-मोठी बॅनर्स लावली आहेत. त्यामुळे शिवसेनेवर आता मोठ्याप्रमाणात टीका होऊ लागली आहे
औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली खरी (CM Uddhav Thackeray), पण अद्यापही त्या कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र, शेतकऱ्यांना कर्जमाफी (Farmers loan waiver) मिळण्याआधीच शिवसेनेच्या वतीने या कर्जमाफीची जाहिरातबाजी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांसह औरंगाबाद शहरातही शिवसेनेने कर्जमाफीची मोठ-मोठी बॅनर्स लावली आहेत. त्यामुळे शिवसेनेवर आता मोठ्याप्रमाणात टीका होऊ लागली आहे (Shivsena Farmers loan waiver).
औरंगाबाद शहरातल्या औरंगपुरा चौकात शिवसेनेकडून एक भलामोठा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचं श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने भलीमोठी जाहिरात केली आहे, अशी टीका आता विरोधक करत आहेत. या जाहिरातीवर ‘करून दाखवलं’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तर संपूर्ण बॅनरवर फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांचेच फोटो लावण्यात आले आहेत. एका ठिकाणी धनुष्यबानाचे चिन्ह आहे. मात्र, शिवसेनेच्या इतर कुठल्याही नेत्याला या बॅनरवर स्थान देण्यात आलेलं नाही. शिवसेनेच्या या बॅनरवर भाजपच्या वतीने आता टीकेची झोड उठवली जात आहे.
भाजपकडून शिवसेनेच्या कर्जमाफीच्या बॅनरबाजीवर टीका केली जात आहे. भाजपच्या या टीकेला शिवसेनेच्या वतीनेही जोरदार प्रतिउत्तर दिलं जात आहे. शिवसेनेच्या बॅनरबाजीवर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं. भाजपनेही आपल्या पाच वर्षांच्या काळात जाहिरातबाजीवर कशी उधळपट्टी केली याचा पाढाच मनिषा कायंदे यांनी वाचला.
भाजप शिवसेना हे कधीकाळी एकमेकांचे जीवश्च, कंठश्च मित्र होते आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे या दोघांचेही परंपरागत विरोधक होते. मात्र, सत्तेची समीकरणं जुळवण्याच्या नादात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळ गेली आणि विरोधीपक्षात बसलेला भाजपही आपल्या परंपरागत विरोधकांना विसरून फक्त शिवसेनेवर निशाणा साधताना दिसत आहे. कर्जमाफीच्या बॅनरबाजीवरुन होणाऱ्या टीकेतून तरी हेच स्पष्ट होत आहे.
Shivsena Farmers loan waiver Banner