प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट? भाजपकडून ती ऑफर, किती जागा देणार, आकडाच जाहीर केला…
धर्माच्या नावाखाली फसवले असा ओबीसी यांचा समज झाला आहे. त्यामुळे भाजपला त्याचा निश्चित फटका बसणार आहे. राष्ट्रीय पक्षांच्या भूमिका आता संपल्या आहेत. कारण मोदी यांना लालू, मान यांना सामोरे जावे लागेल.
सोलापूर | 28 जानेवारी 2024 : आरक्षण हे प्रशासकीय हत्यार आहे. हे हत्यार वापरणं योग्य आहे. त्यामुळे ते सरकारने वापरायला केलं पाहिजे. मराठा आरक्षणाचा मोठा फायदा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे. तर, भाजपला नुकसान होईल. मराठा समाजातील नेते झोपले आहेत. त्यामुळे मराठा समाजातील नेत्यांबद्दल चिड तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सहानुभूती दिसते आहे असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचितबाबत जरांगे पाटील सकारात्मक होते. मात्र, आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे यासाठी ते पर्यटन करतील असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भाजपाने ओबीसी वर्गाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. पण, धर्माच्या नावाखाली फसवले असा ओबीसी यांचा समज झाला आहे. त्यामुळे भाजपला त्याचा निश्चित फटका बसणार आहे. राष्ट्रीय पक्षांच्या भूमिका आता संपल्या आहेत. कारण मोदी यांना लालू, मान यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे राजकारण बदलले आहे असे त्यांनी सांगितले.
रामाची पूजा आठवड्यातून दोनदा, तीनदा किंवा रोज करतात. ती अंगवळणी पडली आहे. त्याचा इफोन्रिया करण्याचा प्रयत्न केला. तो एक दिवसाचा राहिला. लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आणि इतर प्रश्न हे राजकीय सत्तेतून सुटतात. त्यामुळे पोलिटिकल बेनिफिट महाराष्ट्रात तरी होईल असे तरी मला दिसत नाही. मस्जिद तोडून जर पोटाचा प्रश्न सुटणार असेल तर आपण मुस्लिम बांधवांना घेऊन बसू असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ओबीसी महासंघाचा मी घटक नाही. पण, ते मला बोलावतात आणि मी जातो. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचाही आजही मी घटक नाही. त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावले आहे. जो पत्र व्यवहार झाला तो चर्चेसाठी आहे. पण, आता इंडिया आघाडीचे अस्तित्व राहिले नाही याचे काँग्रेसने आत्मपरीक्षण केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
इंडिया आघाडीची मूठ बांधावी यासाठी पहिला प्रयत्न काँग्रेसने नाही तर नितीश कुमार यांनी केला. पहिली बैठक झाली. दुसरी बैठक झाली नाही कारण वेळेचे गणित जमले नाही. तिसरी बैठक कॉंग्रेसने बोलावली. इकडे चौथी बैठक शिवसेनेने घेतली. त्याचवेळी ही आघाडी फार दिवस टिकणार नाही असे मी म्हणालो होतो. आता काय घडले? आता सगळे bold out झाले आहेत. त्यांची नावे कशाला घ्यायची असा टोलाही त्यांनी लगावला.
लोकसभेसाठी वंचितचे 42 उमेदवार तयार आहेत. पण, ते आता जाहीर करणार नाही. माझ्याही मोठ्या सभा झाल्या आहेत. पण, आम्ही एकत्र लढले पाहिजे अशी माझी भूमिका आहे. गेली अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडी एकत्र आहे. असे असतानाही त्यांना अजून जागावाटप करता झाले. त्यांचे काय दुखणे आहे ते मला माहित नाही. जर युती झाली तर आम्ही एकत्र लढू. नाही झाली तर आम्ही स्वतंत्र लढू असा इशारा त्यांनी दिला.
कुणाला भाजपची ऑफर आली असेल आणि त्यांना भाजपमध्ये जायचं असेल त्यांनी खुशाल भाजपमध्ये जावं असा टोला त्यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नाव न घेता लगावला. भाजप तर आम्हाला लोकसभेच्या 120 जागा द्यायला तयार आहेत. हो ही ऑफर आली आहे. पण, जिथे जायचे नाही. त्या रस्त्याला जायचे नाही तिकडे बघायचेही नाही असे सांगत ही ऑफर धुडकावल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.