भाजप ममतांना ‘जय श्री राम’चे 10 लाख पोस्टकार्ड पाठवणार
कोलकाता : पश्चिम बंगालमधील राजकीय तणाव हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजपमध्ये राजकीय द्वंद सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या ‘जय श्री राम’च्या घोषणेवरुन चिडल्या होत्या. त्यानंतर आता भाजपने ममता बनर्जी यांना ‘जय श्री राम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी […]
कोलकाता : पश्चिम बंगालमधील राजकीय तणाव हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजपमध्ये राजकीय द्वंद सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या ‘जय श्री राम’च्या घोषणेवरुन चिडल्या होत्या. त्यानंतर आता भाजपने ममता बनर्जी यांना ‘जय श्री राम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ‘जय श्री राम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे’, असं पश्चिम बंगालचे भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी सांगितलं. गेल्या 30 मे रोजी काही भाजप कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जींसमोर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी ममता बॅनर्जी या चिडल्या आणि त्या भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्या. तर दुसरीकडे काही भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसमोर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या सर्व घटनांनंतर आता अर्जुन सिंह यांनी ममता बॅनर्जी यांना ‘जय श्री राम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला.
अर्जुन सिंह हे स्वत: तृणमूल काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
अर्जुन सिंह आणि भाजप नेता मुकूल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशु रॉय हे क्षेत्रात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप टीएमसी नेता आणि राज्याचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी केला आहे. त्याशिवाय शुभ्रांशु रॉयने गेल्या मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याचंही त्यांनी सांगितलं.
“तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु असताना तिथे काही लोकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. तसेच मदन मित्रा, तपस रॉय आणि सुजीत बोस यांसारखे नेते समाजात अशांती पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर पोलीस आणि आरएएफ कर्मचाऱ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. हे अभूतपूर्व आहे. याप्रकारची संस्कृती बंगालमध्ये कधीही पाहायला नाही मिळाली. ही भाजपची संस्कृती आहे”, असा थेट आरोप मलिक यांनी केला.
दुसरीकडे, अर्जुन सिंह यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “तृणमूल काँग्रेसचे नेता अनावश्यक बोलत आहेत. लोकांनी तृणमूल काँग्रेसला नाकारलं आहे आणि ही त्यांची प्रतिक्रिया आहे”, असं अर्जून सिंह म्हणाले.
सध्याच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने पश्चिम बंगालच्या 42 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आता तृणमूलला भाजप टक्कर देताना दिसत आहे. इतकंच नाही तर आता तृणमूलचे अनेक नेतेही भाजपची वाट धरु लागले आहेत.
पाहा व्हिडीओ :