भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या, शेलार पुन्हा कृष्णकुंजवर
राज्यात महाविकासआघाडी स्थापन झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं कमालीची बदलत आहेत. भाजप आणि मनसेमधील जवळीक सातत्याने वाढताना दिसत आहे.
मुंबई : राज्यात महाविकासआघाडी स्थापन झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं कमालीची बदलत आहेत. भाजप आणि मनसेमधील जवळीक सातत्याने वाढताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी वाढल्या आहेत. आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली (Aashish Shelar meet Raj Thackeray). शेलार यांची ही राज ठाकरेंची दुसरी भेट आहे. याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती.
राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्यावर वाटचाल सुरु केल्यानं भाजपशी जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांचीही गुप्त बैठक झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी मनसेच्या मुंबईतील आझाद मैदानावरील मोर्चाच्या बरोबर आधी आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. आता पुन्हा एकदा आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांची राज ठाकरेंशी कोणत्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे.
राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट
मागील काळात 7 जानेवारीला भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Devendra Fadnavis meet Raj Thackeray) यांच्यात मुंबईत गुप्त बैठक झाली होती. प्रभादेवी येथील इंडिया बुल्स स्काय या हॉटेलमध्ये जवळपास तास- दीड तास ही भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं जुळताना दिसत आहेत. या भेटीनंतर राज ठाकरे हॉटेलच्या मागच्या गेटने बाहेर पडले. ही भेट अत्यंत गोपनीय होती. जवळपास 1 ते दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले होते.
मनसे हिंदुत्वाच्या दिशेने?
मनसेने आपल्या पहिल्या महाअधिवेशनात झेंडा आणि अजेंडा बदलला आहे. मनसेने भगव्या रंगाचा नवा झेंडा स्वीकारला आहे. शिवाय राज ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका पहिल्यापासूनच असल्याचं म्हटलं होतं. याअगोदर महाराष्ट्रात शिवसेनेकडे कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पाहिले जात होते. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यामुळे निर्माण झालेला स्पेस भरुन काढण्यासाठी मनसे भाजपची साथ देऊन हिंदुत्वाच्या मुद्दावर ही नवी युती होऊ शकते.
संबंधित बातम्या
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत
आधी स्वत: देवेंद्र फडणवीस, आता आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला