काळी टोपी घालणारे सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड करत नाहीत; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
हे भाषण म्हणजे गडबडलेल्या आणि गोंधळलेल्या पक्षप्रमुखाच्या भाषणाचा उत्तम नमुना होता. | Atul Bhatkhalkar
मुंबई: काळी टोपी घालणारे सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड करत नाहीत. आम्ही तुमच्याप्रमाणे कसाबला बिर्याणी देणाऱ्यांसोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेलो नाही, अशा शब्दांत भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणात हिंदुत्वाचा मागमूसही नव्हता. हे भाषण म्हणजे गडबडलेल्या आणि गोंधळलेल्या पक्षप्रमुखाच्या भाषणाचा उत्तम नमुना होता. या भाषणात ना धड हिंदुत्व, ना धड विकास , ना धड सेक्युलरिझम होता. आपण नेमकं काय बोलतोय, याची जाणीव उद्धव ठाकरे यांना स्वत:ला तरी होती का, असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. (Atul Bhatkhalkar criticize Uddhav Thackeray dussehra rally speech)
उद्धवजी, संघवाल्यांच्या काळ्या टोपी खाली मेंदू असतोच, परंतु तो मेंदू सत्ता मिळावी म्हणून टोप्या फिरवणारा नसतो… pic.twitter.com/XROwMttll2
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 25, 2020
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला संबोधित करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणाचा दाखला देत भाजपच्या नेत्यांना टोले लगावले. भागवतांना मानणारे लोक असतील तर त्यांनी नुसती काळी टोपी घालू नये. त्या टोपीखाली डोकं असणाऱ्यांनी थोडा विचारही केला पाहिजे. हिंदुत्व समजून घेतलं पाहिजे, असे उद्धव यांनी म्हटले होते.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले. काळ्या टोपीखाली मेंदू असतो आणि तो मेदू कधी सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड करत नाहीत, टोप्या फिरवत नाही. सावरकर स्मारकामध्ये आज शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. त्यावेळी सावकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसवर टीका करणे सोडाच, पण स्वातंत्र्यवीर सावकरांविषयी चार गौरवास्पद शब्द बोलण्याची हिंमतही आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये राहिलेली नाही. त्यामुळे काँग्रेस नाराज होण्याची भीती त्यांना वाटते. याशिवाय, भाषणात अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काय करणार, याचाही उल्लेख नव्हता. हे भाषण केवळ राजकीय होते, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.
संबंधित बातम्या:
काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला
इकडे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता; हे तुमचं हिंदुत्व?: उद्धव ठाकरे
संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे?, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल
(Atul Bhatkhalkar criticize Uddhav Thackeray dussehra rally speech)