अजित पवार क्यूँ डरते है? देवेंद्र फडणवीसांनी हत्यार उपसलं
राज्य सरकारमधील नेते ही निवडणूक न घेता विरोधकांनी सभागृहात अविश्वास ठरावा आणावा, अशी आव्हानात्मक भाषा करत आहेत. | Devendra Fadnavis
मुंबई: महाविकासआघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेता विरोधकांना अविश्वास ठराव आणण्याचे आव्हान देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या वक्तव्यामागे त्यांचा आमदारांवरील अविश्वास कारणीभूत आहे का? अजित पवार नेमकं कशाला घाबरत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. (Devendra Fadnavis slams Ajit Pawar)
ते सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विधानसभा अध्यक्षपद रिक्त असल्यास त्यासाठी तात्काळ निवडणूक होते हे संविधानाप्रमाणे बंधनकारक आहे. त्यामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात पत्र पाठवून राज्य सरकारला विचारण केली होती.
मात्र, राज्य सरकारमधील नेते ही निवडणूक न घेता विरोधकांनी सभागृहात अविश्वास ठरावा आणावा, अशी आव्हानात्मक भाषा करत आहेत. अजित पवार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास का घाबरत आहेत? आपलेच आमदार आपल्याविरोधात मतदान करतील, असे त्यांना वाटते का? त्यांचा स्वत:च्या आमदांरांवर विश्वास नाही का? त्यामुळे अजित पवार यांच्या या वक्तव्याला अर्थ नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
अजित पवार काय म्हणाले होते?
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनाच्या तोंडावर वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पुजा चव्हाण प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची घोषणा केली असताना महाविकास आघाडी सरकार हे अस्थिर आहे यांच्यामधील नेते घाबरलेले आहेत, संधी मिळाली तर आमदार सोडून जातील या भीतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत नाही असे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
त्याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, `अविश्वास ठराव आणावा वाजवून सांगतो किती आमदार आमच्या सोबत आहेत`, असं प्रतिआव्हान भाजपला दिले होते.
“निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे”
आघाडी सरकारच्या काळात अशा घटनात्मक पदांसाठी शक्यतो पुन्हा पुन्हा निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे ठरत असते, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद पाच वर्षासाठी दिलं. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार, पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, यासाठी सावधान राहावे लागेल, असंही सामनाच्या अग्रलेखात सुचवलं आहे.
संबंधित बातम्या:
संजय राऊत-जयंत पाटलांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘धोक्याची’ काळजी?
राज्यपाल विरुद्ध सरकार संघर्ष पुन्हा उफाळणार; आता विधानसभा अध्यक्षपद कारण ठरणार
(Devendra Fadnavis slams Ajit Pawar)