Pune Gopichand Padalkar : शरद पवारांना बहुजनांचा इतिहास मोडीत काढायचाय; किल्ल्यांच्या प्रश्नावरून गोपीचंद पडळकर आक्रमक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना बहुजनांचा इतिहास मोडीत काढायचा आहे. मागे काही ठेवायचे नाही अशी यांची भूमिका आहे, अशी टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे, ते पुण्यात बोलत होते.
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना बहुजनांचा इतिहास मोडीत काढायचा आहे. मागे काही ठेवायचे नाही अशी यांची भूमिका आहे, अशी टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे, ते पुण्यात बोलत होते. संबंध नसताना सांगलीत (Sangli) अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करता, जेजुरीत जाता पण वाफगावच्या किल्ल्याबद्दल तुम्ही बोलत नाही, असा सवाल त्यांनी केला. आता किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्ही ताब्यात घेऊन किल्ल्याचा जिर्णोद्धार करू, असा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिला आहे. लोकवर्गणीच्या माध्यमातून हा जीर्णोद्धार आम्ही करू. मात्र या निमित्ताने शरद पवार आणि राज्य सरकारची नियत आता लक्षात आली असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला. रयत शिक्षण संस्थेवरूनही पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
‘करायचे एक आणि दाखवायचे एक’
वाफगावमधील यशवंतराव होळकरांचा किल्ला राज्य सरकारने ताब्यात घ्यावा. हा किल्ला सध्या रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे. म्हणजेच बहुजनांचा इतिहास त्यांना मोडीत काढायचा आहे. एका बाजूला करायचे एक आणि दाखवायचे एक ही यांची भूमिका आहे. आता आम्हीच या किल्ल्याचा जीर्णोद्धार करू. याविषयी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेणार असल्याचेही पडळकर यांनी सांगितले.