Kirit Somaiya | संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार!
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 10 जून रोजी महाराष्ट्रात झालेल्या राज्यसभा निवडणुकीवरून शिवसेनेवर आरोप केले आहे. या निवडणुकीत सर्व आमदारांनी मतदान केले. मात्र आपल्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील आमदारांवर मोठा दबाव आणल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
नवी दिल्ली | राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आमदारांना थेट बंदूक दाखवूनच धमकी दिली, असा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी केला आहे. या प्रकरणी दिल्लीत आज त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार दाखल केली आहे. राज्यसभा निवडणूकीत आमदारांवर दबाव आणण्यासाठी शिवसेना आणि संजय राऊत यांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले. यात त्यांना धमकावण्यापर्यंत मजल गेल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्यसभेची ही निवडणूक शिवसेनेने भ्रष्ट केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. आता निवडणूक आयोगामार्फत सोमय्यांच्या आरोपांची काय दखल घेतली जाते, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
किरीट सोमय्यांचा आरोप काय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 10 जून रोजी महाराष्ट्रात झालेल्या राज्यसभा निवडणुकीवरून शिवसेनेवर आरोप केले आहे. या निवडणुकीत सर्व आमदारांनी मतदान केले. मात्र आपल्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील आमदारांवर मोठा दबाव आणल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. एवढंच नाही तर संजय राऊत यांनी थेट आमदारांना बंदूक दाखवून धमकीच दिल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. अशा आशयाची तक्रारही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयामार्फतही आमदारांवर दबाव आणला जात असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.
‘दगाबाजांना बघून घेईन’
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिकांसमोर शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. या निकालानंतर प्रतिक्रिया देताना, ऐनवेळी काही आमदारांनी दगाबाजी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसेच दगाफटका केलेल्यांची यादी माझ्याकडे असून प्रत्येकाला बघून घेतलं जाईल, अशी भाषाही संजय राऊत यांनी वापरली होती. महाविकास आघाडीला आमदारांनी मतदान करावं, यासाठी अपक्षांसहित सर्वपक्षीय आमदारांची बैठक उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी घेतली होती. यावेळी सर्व आमदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच मत देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतरही काही आमदारांनी दगाबाजी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.