Maharashtra politics : संजय राऊत कालही महत्त्वाचे नव्हते आजही नाही; उद्धव ठाकरेंनी ठरवावे त्यांचं काय करायचं, विखे पाटलांचा टोला
संजय राऊत हा कालही महत्त्वाचा मुद्दा नव्हता आणि आजही महत्त्वाचा मुद्दा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा त्यांचं काय करायचं असा टोला राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी लगावला आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. सरकार अल्पमतात आल्याचे चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून पुन्हा -पुन्हा आमदारांची मनधरणी करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून बंडखोर आमदारांवर अतिशय तिखट शद्बात टिका करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हा कालही महत्त्वाचा मुद्दा नव्हता, आजही नाही. आता उद्धव ठाकरे यांनी ठरवावे संजय राऊत यांचं नेमकं काय करायचं? असा टोला विखे पाटलांनी लगावला आहे. सध्या तरी आम्ही वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत. मात्र येत्या आषाढी एकादशीला देवेंद्र फडणवीस हेच विठ्ठलाची पूजा करतील एवढे नक्की असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
काय म्हणाले विखे पाटील?
2019 ला विधानसभा निवडणुकीत जनतेने युतीला स्पष्ट बहुमत दिले होते. फडणवीस हे मुख्यमंत्री होणे अपेक्षित होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी जनमताचा अनादर करत, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत अनैसर्गिक आघाडी केली. त्याची मोठी किंमत त्यांना आज मोजावी लागत आहे. शिवसेनेचे जवळपास अस्तित्व संपले आहे. ही अनैसर्गिक आघाडी न पटल्याने एक स्वाभिमानी लोकांचा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडला आहे. त्यांची हीच इच्छा आहे की, भाजप आणि शिवसेना युती व्हावी. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील 40 पेक्षा अधिक आमदारांनी पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. दरम्यान त्यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. संजय राऊत हा कालही महत्त्वाचा मुद्दा नव्हता आणि आजही नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.
विठ्ठलाची पूजा फडणवीसच करणार
पुढे बोलताना विखे पाटील यांनी म्हटले आहे की, सध्या तरी आम्ही वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत. आमचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील तेच सांगितले आहे. मात्र एवढे नक्की की येत्या आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करण्याचा मान हा देवेंद्र फडणवीस यांनांच मिळेल. जनमताचा अनादर करून उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केले. मात्र आता त्यांच्यापुढे राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.