Metro carshed | 4 हजार कोटींच्या उधळपट्टीचा शौक असेल, तर मंत्र्यांनी स्वत:च्या खिशातले उडवावे, राम कदमांची टीका
'टीव्ही 9 मराठी'शी बोलताना भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (BJP Leader Ram Kadam On Mumbai Metro carshed)
मुंबई : आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे. “महाराष्ट्रातील करदात्या जनतेच्या 4 हजार कोटींची उधळपट्टी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित केला आहे. ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (BJP Leader Ram Kadam On Mumbai Metro carshed)
“राज्यातील 4 हजार कोटींची बरबादी ही करदात्या महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाची बरबादी आहे. ज्या ठिकाणी आरेत हे कारशेड बनणार होतं, त्या ठिकाणी झाडं नाही. रोपट्याचं पान तोडण्याचीही आवश्यकता नाही. पूर्णपणे क्रिकेट, फुटबॉल खेळू शकतो एवढं मोठं मैदान तयार झालं आहे,” असा दावा राम कदम यांनी केला.
“पण केवळ इगोपोटी किंवा खोट्या स्वाभिमानापोटी हे महाराष्ट्राचे सरकार जनतेचे 4 हजार कोटी वाया घालवत आहे. एवढाच जर 4 हजार कोटी बरबाद करण्याचा शौक असेल तर सर्व मंत्र्यांनी स्वत:च्या खिशातले करावे. करदात्या जनतेच्या 4 हजार कोटींचा उधळपट्टी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र
तर दुसरीकडे मेट्रो कारशेडवरुन महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
“मेट्रो कारशेड संपूर्ण महाराष्ट्रचं नाही तर संपूर्ण जगाला किती खालच्या पातळीवर राजकारण सुरु आहे हे दिसतं आहे. जर केंद्राची जागा आहे, तर ती जागा महाराष्ट्राच्या कामासाठी मागत आहोत. अशा अनेक जागा आहेत, त्या केंद्राने दिल्या असतील. पण कुरघोड्या करणं असे काही होत आहे. तर मराठीतील म्हणीप्रमाणे आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना अशी महाराष्ट्राची अवस्था करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता मेट्रोच्या कारशेडवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. नुकतंच केंद्राने याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे.
“कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही. यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणं चुकीचं आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा,” असेही केंद्राने या पत्रात लिहिलं आहे. (BJP Leader Ram Kadam On Mumbai Metro carshed)
संबंधित बातम्या :
हे तर महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र; मेट्रोच्या वादात मुंबईच्या महापौरांची उडी
मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने; कांजूरमार्गची जागा आमची, केंद्राचा दावा