122 मजली इमारतीच्या 42 नंबरच्याच रुमचं मी बघेन, 41 चं विचारु नका : चंद्रकांत पाटील
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात भाजपची महाजनादेश यात्रा (BJP Mahajanadesh Yatra) सुरु होणार आहे. 1 ऑगस्टपासून ही यात्रा राज्यभरात जाणार आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात भाजपची महाजनादेश यात्रा (BJP Mahajanadesh Yatra) सुरु होणार आहे. 1 ऑगस्टपासून ही यात्रा राज्यभरात जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी या यात्रेची रुपरेषा आज जाहीर केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेबाबतचे प्रश्न विचारण्यात आले.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश-आदित ठाकरेंची जन आशीर्वाद
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आणि आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा दोन्हीचे मार्ग आमने-सामने येणार नाहीत का असं चंद्रकांत पाटलांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, “आमचं विचार आणि ध्येय एकच आहे. सेना-भाजपचं ध्येय महाराष्ट्रात युतीचं सरकार आणणं हेच आहे”
मुख्यमंत्रिपदाबाबत
मुख्यमंत्रिपदाबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना म्हणतेय की आमचं ठरलंय, पण मी पण म्हणतोय आम्हला माहीत नाही. ठरले असेल तर त्यावेळी बघू. माझा स्वभाव असा की आपल्याला दिलेलं काम करायचे. समजा 122 मजली इमारत आहे, त्यात 42 नंबरची खोली अस्वच्छ आहे. ती कशी स्वछ करायची हे मी बघेन. 41 नंबरच्या खोलीत कचरा आहे, हे त्या इमारतीच्या प्रमुखाचे काम आहे. मला जेव्हा सांगेल 41 नंबरच्या खोलीचं बघ, तेव्हा मी बघेन. त्यामुळे आता मुख्यमंत्री कुणाचा हा माझा विषय नाही. अमित भाई, मुख्यमंत्री ते बघतील”.
चंद्रकांत पाटलांनी जे उदाहरण दिलं, त्याचा अर्थ म्हणजे त्यांच्याकडे जे काम दिलं आहे (संघटना बांधणी), तेवढंच ते करतील. मुख्यमंत्रिपदाबाबत आपल्याला विचारु नये, असं त्यांचं म्हणणं.
मुख्यमंत्रिपदाची मागणी, इच्छा, महत्वाकांक्षा असणे असे शिवसेनेला वाटणे गैर नाही. पण प्रत्येकाची महत्वाकांक्षा व्यवहारात येते असे नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठा मोर्चाबाबत
या देशात लोकशाही इतकी प्रगल्भ आहे की कुणी काहीही करु शकतो. त्यामुळे त्यांना वाटले निवडणूक लढवावे तर चुकीचे काय? असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.
समोर तगडा उमेदवार हवा
काँगेसकडे उमेदवारी मागणीसाठी 900 अर्ज आले आहेत, यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “त्यांना खूप शुभेच्छा. त्यांच्याकडे अजून अर्ज यावेत म्हणजे आम्हाला लढायला मजा येईल. समोर तगडा उमेदवार नसेल तर लढायला मजा येत नाही”