सर्वाधिक आमदारांचे राजीनामे घेणाऱ्या हरिभाऊ बागडेंचा पत्ता कट?
भाजपने लोकसभा निवडणुकीत वयाचा निकष लावत अनेक वयस्कर खासदारांना तिकीट नाकारलं होतं. विधानसभेला हाच कित्ती गिरवण्याचं सूतोवाच चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.
मुंबई : सर्वाधिक आमदारांचे राजीनामे स्वीकारण्याचा विक्रम करणारे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (BJP MLA Haribhau Bagde) यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पंचाहत्तरी पार केलेल्या उमेदवारांचं तिकीट कापण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्यामुळे बागडेंवर टांगती तलवार आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीत वयाचा निकष लावत अनेक वयस्कर खासदारांना तिकीट नाकारलं होतं. विधानसभेला हाच कित्ती गिरवण्याचं सूतोवाच चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीत 75 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या उमेदवारांना तिकीट दिलं जाणार नसल्याचं पाटलांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उमेदवारीचं काय होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हरिभाऊ बागडे हे औरंगाबादेतील फुलंब्री मतदारसंघातून भाजप आमदार आहेत. हरिभाऊंनी (BJP MLA Haribhau Bagde) नुकतीच वयाची पंचाहत्तरी गाठली आहे. बागडेंच्या उमेदवारीवरुन बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे बागडेंच्या उमेदवारीवरुनही कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराचे वारे राज्यभर वाहू लागले आहेत. अशातच राज्यातील तीसपेक्षा अधिक आमदारांनी राजीनामा दिले आहेत. हे सर्व राजीनामे विधानसभा अध्यक्ष या नात्याने बागडेंनी स्वीकारले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक राजीनामे स्वीकारण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.
राजीनामे स्वीकारण्याच्या यादीतील सर्वात ताजं नाव होतं अजित पवार यांचं. अजित पवारांनी पक्षांतर केलं नसलं, तरी उद्विग्नतेतून राजीनामा दिला होता. याआधी कित्येक आमदारांच्या पक्षांतरापूर्वी बागडेंनी धावपळ करत राजीनामा घेतला. यामध्ये भास्कर जाधव, अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे.
दुसरीकडे हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघातून भाजपकडून अनेक इच्छुकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे आता बागडे यांच्या उमेदवारी बाबत पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विधानसभा अध्यक्ष दुचाकीवर, भास्कर जाधवांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी धावाधाव
महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर 21 सप्टेंबरला वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली.