‘मराठा समाजाला आरक्षण द्या, अथवा आम्हास विष पिऊन मरु द्या’, खा. उदयनराजेंची फेसबुक पोस्ट, वाचा सविस्तर
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्ला चढवला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, अथवा आम्हास विष पिऊन मरु द्या, अशा मथळ्याखाली उदयनराजेंनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्ला चढवला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, अथवा आम्हास विष पिऊन मरु द्या, अशा मथळ्याखाली उदयनराजेंनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात आरक्षण या विषयावर एककलमी कार्यक्रम हाती घ्या. कोरोनाने भरपूर वेळ दिला आहे. हा वेळ अन्यायाविरुद्ध झुंजत असलेल्या समाजाच्या प्रश्नासाठी द्या. तातडीने मराठा आरक्षणाचा निकाल लावा. अन्यथा खुर्च्या खाली करा, असा इशाराच उदयनराजे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.(Udayan Raje Bhosale’s Facebook post on the issue of Maratha reservation)
खा. उदयनराजे भोसले यांची फेसबुक पोस्ट
“मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात का? मराठा समाजातील लाखो तरुन निराशेच्या गर्तेत आहेत. आरक्षणाचा प्रश्न आता सुटला नाही तर तो कधीच सुटू शकत नाही, याची जाणीव मराठा समाजातील तरुणांना झाली आहे. सरकारने गांभीर्याने घेतलं नाही तर मराठा समाजातील तरुण वेगळे पाऊल उचलू शकतात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरु द्या”.
मराठा समाजाला आरक्षण द्या अथवा आम्हास विष पिऊन मरु द्या. आरक्षण या विषयावर एककलमी कार्यक्रम हाती घ्या. कोरोनाने भरपूर वेळ दिला आहे, हा वेळ अन्यायविरुध्द झुंजत असलेल्या समाजाच्या प्रश्नासाठी द्या. तातडीने मराठा आरक्षणचा निकाल लावा. अन्यथा खुर्च्या खाली करा.https://t.co/SoyA9MxhUV pic.twitter.com/aINKDKMPx2
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 10, 2021
बैठकांंमध्ये फारसं गांभीर्य नाही
“महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर करणाऱ्यांनी शेकडो वर्षे समाजाच्या प्रश्नांना झुलवत ठेवलं आहे. मराठा समाजातील तरुणांना गृहित धरुन शेकडो वर्षे सत्तेच्या पदांवर बसणाऱ्यांनी आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवला. इतर समाजांना आरक्षण देताना गांभीर्याने विधाने करणारे आणि कायदेशीर बाजू पुरेपूर लावून धरणारे सत्ताधारी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मात्र मेखा मारुन बसले आहेत. अलिकडे होत असणाऱ्या बैठकांमध्ये मला फारसे गांभी्रर्य दिसत नाही”.
योग्य पावलं का उचलली नाहीत?
“आजपर्यंत 40 पेक्षाही जास्त मराठा बांधवांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी बलिदान दिले आहे. आरक्षणासाठीच्या रस्त्यावरचा संघर्ष देशाने पाहिला आहे. गुरं-ढोरं, बायका-मुलांसह मराठा समाज क्रांती मोर्चा दरम्यान रस्त्यावर उतरला होता. न्यायालयात कायद्याला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने जी पावले उचलायला हवी होती ती पावले का उचलली नाहीत? या कायद्याला स्थगिती दिल्यानंतर सरकारने केलेली कार्यवाहीही सदोष होती. कायद्याला मिळालेली स्थगिती उठवायची असेल तर आदेशाच्या विरोधात रिव्ह्यूव पिटिशन का दाखल केले नाही? राज्य सरकारने सुधारित अर्ज का दाखल केला? जेव्हा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस आला तेव्हा कोणतीही बाजू न मांडता आम्हाला सुनावणी घटनापीठासमोर करायची असल्याचं राज्य सरकारनं न्यायालयाला का सांगितलं? त्यानंतर जेव्हा घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली तेव्हा आपली तयारी नसल्याचे सांगून सरकारने तयारीसाठी वेळ का मागितला? हा घटनाक्रम पाहिला तर राज्य सरकारमध्ये बसलेले मराठा आरक्षणासंदर्भात किती उदासिन आहेत हे लक्षात येते. त्यामुळे राज्यकर्त्यांबाबत मराठा समाजातील तरुणांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे”.
तरुणांनी कायदा हातात घेतला तर जबाबदार कोण?
“उद्या या तरुणांनी कायदा हातात घेतला, संहार घडवला, रक्तपात केला तर त्याला जबाबदार कोण? एकीकडे एसईबीसी पात्र उमेदवारांना ईडब्ल्यूएस लागू करण्याचा निर्णय घ्यायचा आणि दुसरीकडे एसईबीसीच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात वेळकाढूपणा करायचा ही कसली निती आहे? मराठा समाजाने तुम्हाला एवढी वर्षे सत्ता दिली त्याचे तुम्ही असे पांग फेडत आहात का? दिरंगाईची ही खदखद कोणत्या टोकाला जाईलहे आता मीही सांगू शकत नाही. राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नात गंभीर नसल्याने मी स्वत: खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या भेटी घेवून त्यांना वस्तुस्थिती सांगितली आहे”.
प्रश्नांची सरबत्ती
“मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीतही मी माझी मते मांडली आहेत. मात्र, अशा बैठकांमध्येही राज्य सरकार गंभीर नसल्याचं मला जाणवत आहे. बैठकानंतर कोणताही फॉलोअप का घेतला जात नाही? केवळ वेळकाढूपणा सुरु आहे. सर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानही याबाबत कोणतेही सुतोवाच होत नाही. याचा अर्थ तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचेच नाही. मराठा समाजातील युवक-युवती फक्त तुम्हाला तुमच्या पक्षांच्या राजकीय सभांना, मेळाव्यांना गर्दी करायला हवे आहेत का? रस्त्यारस्त्यांवर तुमच्या पक्षांचे झेंडे लावायला हवे आहेत का? बुथवत मतांचा गल्ला गोळा करायला हवे आहेत का? नोकऱ्यांविना तडफडणारे हे जीव तुम्हाला दिसत नाहीत का? पोटे खपाटीला गेलेले त्यांचे आईवडील तुम्हाला दिसत नाहीत का? काबाड कष्ट करुनही आणि मेरीटमध्ये येवूनही संधी उपलब्ध होत नसल्याने या तरुणांनी नक्षलवाद स्वीकारला तर त्याला राज्यकर्ते म्हणून तुम्हीच जबाबदार नाही का?”
‘नाहीतर खुर्च्या खाली करा’
“जनाची नाही मनाची लाज वाटत असेल तर मराठा आरक्षण या विषयावर एककलमी कार्यक्रम हातात घ्या. कोरोनाने तुम्हाला भरपूर वेळ दिला आहे. हा वेळ शेकडो वर्षे अनायाविरुद्ध झुंजत असलेल्या समाजाच्या प्रश्नासाठी द्या. तातडीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निकाल लावा. नाहीतर आम्हाला हे जमणार नाही असे जाहीर करुन खुर्च्या खाली करा. मराठा आरक्षण तरी द्या, अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या”.
संबंधित बातम्या :
‘मराठा आरक्षणाबाबत तुमचे तुम्ही बघून घ्या अशी केंद्राची भूमिका’, अशोक चव्हाण यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
मराठा आरक्षणाचा कायदा बेकायदेशीर, मोदी सरकारने महाराष्ट्राच्या पाठित खंजीर खुपसला; काँग्रेसची टीका
Udayan Raje Bhosale’s Facebook post on the issue of Maratha reservation