फरक पडायला शिल्लक काय राहिलंय?, भाजपाच्या ‘या’ नेत्याचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
शिवसेनेवर कितीही आघात झाले तरी शिवसेनेला फरक पडत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
मुंबई : भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार टोला लगावला आहे. शिवसेनेवर कितीही आघात झाले तरी शिवसेनेला फरक पडत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर टीका करताना अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांची ही बडबड हताश आणि अहंकारी माणसाची आहे. ते पूर्वीही घरात बसून होते. त्यांनी आताही घरात बसून राहावं घरात बसून राहणाऱ्या माणसांना वादळाची भीती नसते. उद्धव ठाकरेंकडे आता केवळ 15 आमदार राहिले आहेत. आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक आमदारांनी उठाव केला मात्र त्याचही उद्धव ठाकरेंना काहीच वाटलं नाही, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
सुषमा अंधारेंवर प्रतिक्रिया
दरम्यान त्यांनी यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भातखळकर यांनी म्हटलं आहे की, या त्याच अंधारे आहेत ज्यांनी प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्णावर देखील टीका केली होती. त्यांच्यावर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना जर वाटत असेल की आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीचा आहे, तर त्यांनी न्यायालयात जावे असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होतं?
उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटलं होतं की शिवसेना 56 वर्षांची झाली आहे. या 56 वर्षांत शिवसेनेवर अनेक अघात झाले. मात्र या आघाताने शिवसेना कधी संपली नाही, उलट अधिक जोमाने पुढे आली. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भातखळकर यांनी टीका केली आहे.