मुंबई: शिवसेनेत (shivsena) फूट पाडल्यानंतर आता भाजपने मुंबई महापालिकेवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. त्याची सुरुवात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून करण्यात येणार आहे. भाजपच्या (bjp) मुंबईच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच आशिष शेलार (ashish shelar) यांनी वरळीत भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. जांबोरी मैदानात हा उत्सव पार पडणार आहे. दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून आशिष शेलार महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे या दहीहंडी उत्सवाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वरळीतील कोळी बांधवांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. कोळी बांधवांना आपल्याकडे खेचून आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाला सुरुंग लावतानाच पालिकेत वरळीतून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचीही भाजपची खेळी आहे. त्यामुळे भाजपच्या खेळीला कितपत यश मिळते याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई अध्यक्ष पदावर पुन्हा वर्णी लागताच आशिष शेलार यांचे पहिले लक्ष्य वरळी ठरलं आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघात भाजपने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. वरळीतील जांबोरी मैदानात शुक्रवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन होणार आहे. त्यामुळे या उत्सवाला कसा प्रतिसाद मिळणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
शिवसेना नेते आणि आमदार सचिन अहिर दरवर्षी वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत असतात. सचिन अहिर आणि वरळीतील दहीहंडी उत्सव हे समीकरच ठरलेलं आहे. पण यंदा पहिल्यांदाच भाजपने सर्वात आधी जांबोरी मैदान पटकावून अहिर यांच्यावर मात केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून दहीहंडी उत्सव आयोजनासाठी जांबोरी मैदान परिसरात नव्या जागेचा शोध सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा वरळीत पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजपचा भव्य दहीहंडी उत्सव पाहायला मिळणार आहे. मात्र, वरळीकर कुठल्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे, जांबोरी मैदानाच्या सुशोभीकरणावर महापालिकेने अलीकडेच जवळपास 2 कोटी रुपये खर्च केले आहेत. दहीहंडी उत्सवाच्या आयोजनामुळे तो खर्च वाया जाऊ नये यासाठी तिथे उत्सव साजरा न करण्याची भूमिका घेतल्याचा दावा स्थानिक शिवसेना नेत्यांनी केला आहे.
वरळीत शिवसेनेचे तीन आमदार आहे. आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडून आले आहेत. तर वरळी परिसरातच राहणारे सुनील शिंदे आणि सचिन अहिर हे विधान परिषदेचे आमदार आहेत. या परिसरातील खासदार शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा याच परिसरातील आहेत. शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक वरळीतच राहतात. असं असतानाही भाजपने जांबोरी मैदान पटकावण्यात यश मिळवलं आहे.