भाजपची कार्यकारिणी जाहीर, प्रीतम मुंडे राज्यात, पंकजा मुंडे केंद्रात
राज्याचं लक्ष लागलेल्या भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर झाली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही.
मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर झाली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही. त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. महत्त्वाचं म्हणजे राज्यात पंकजा मुंडे यांना मोठी जबाबादारी दिली जाईल असं म्हटलं जात होतं, मात्र त्यांच्याऐवजी खासदार प्रीतम मुंडे यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. (Chandrakant Patil announced BJP executive committee)
“पंकजाताईंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, कोअर कमिटीच्या सदस्या शंभर टक्के असतील, केंद्राची जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी, पंकजाताई किंवा एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे यांना जबाबदारी दिली असं नाही, असंही स्पष्टीकरण दादांनी दिलं.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोरोना संकटामुळे भाजपची कार्यकारणी घोषित करायची राहिली होती. कोणतीही घोषणा सगळ्यांशी बोलून, सगळ्यांना बरोबर घेऊन करायची असते. त्यामुळे थोडा वेळ लागला. माझ्याबरोबर 12 प्रदेश उपाध्यक्ष आहेत. 5 सेक्रेटरी म्हणजेच सरचिटणीस आहेत.
या प्रमुख कार्यकारणीत माझ्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. याशिवाय 7 प्रमुख मोर्चे असतात. त्याचे अध्यक्षही आम्ही घोषित करतो. या व्यतिरिक्त 18 प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे प्रमुख घोषित करत आहोत. प्रदेशाचे कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख आम्ही घोषित करत आहोत”.
कार्यकारणी सदस्य 69 असतील. निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात. राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल.
नागपूरचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महामंत्री आहेत. आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, श्रीकांत भारती महामंत्री आहेत. विजय पुराणिक महामंत्री संघटक आहेत.
भाजपची कार्यकारिणी
महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक
उपाध्यक्ष –माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर असे 12 उपाध्यक्ष असतील
सेक्रेटरी –
माजी आमदार प्रमोद जठार, , संजय पुराम, अॅड धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षा खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे, दयानंद चोरगे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाने, अर्चना तेहटकर
विधानसभेत मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि प्रतोद माधुरी पिसाळ
पंकजांना केंद्रात जबाबदारी
याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “पंकजा मुंडे यांना केंद्रामध्ये चांगली जबाबदारी मिळणार आहे. केंद्राने असं सूचवलं की, केंद्रामध्ये त्यांना जबाबदारी देत आहोत. त्यामुळे आमच्या कोअर कमिटीच्या त्या 100 टक्के सदस्या असतील. त्या आमच्याबरोबरच राहतील. पण महाराष्ट्रात वेळ देणं बरोबर नाही, कारण त्यांनी केंद्रात वेळ द्यावा, अशी केंद्राची अपेक्षा आहे. त्यामुळे केंद्राची जबाबदारी महाराष्ट्राच्या कोअर कमिटीच्या सदस्यांना शंभर टक्के असेल. एकनाथ खडसे, प्रकाश मेहता सर्व कार्यकारणीत आहेत. ती यादी आता वाचणं शक्य नाही”.
प्रीतम मुंडे, रक्षा खडसे या दोन टर्म खासदार आहेत. कर्तृत्वान आहेत. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे त्यांना काम मिळाले. पंकजा ताईंची बहीण किंवा एकनाथ खडसे यांची सून म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आलेली नाही. नाराजी दूर करण्याचा प्रश्नच नाही. नाराजी तात्पुरती असते, असं चंद्रकांत पाटलांनी नमूद केलं.
(Chandrakant Patil announced BJP executive committee)
संबंधित बातम्या