BJP on Sanjay Raut : ‘नाक घासून मिळवलेल्या सत्तेचा माज दाखवायचा नसतो, नाहीतर…’, भाजपचा संजय राऊतांवर पलटवार
आता शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाक् युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय.
मुंबई : राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात टीका आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बाबरी मशिद प्रकणातील दाव्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला हाणला होता. ‘तुम्ही खरच तिकडे गेला होतात तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती’, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर रविवारी देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय. ‘बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझं वजन 128 होतं. वजनदार लोकांपासून सावध राहा’, असा इशाराच त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय. त्यानंतर आता शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाक् युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय.
फडणवीस यांनी रविवारी घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत फडणवीसांवर निशाणा साधला. ‘उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे’, असं ट्वीट राऊतांनी केलंय.
उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2022
त्यानंतर भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राऊत यांच्या ट्वीटला उत्तर देण्यात आलंय. ‘नाक घासून मिळवलेल्या सत्तेचा माज दाखवायचा नसतो. जनता हा माज क्षणात उतरवेल’, असा टोला भाजपनं लगावला आहे.
नाक घासून मिळवलेल्या सत्तेचा माज दाखवायचा नसतो @rautsanjay61 .
जनता हा माज क्षणात उतरवेल! https://t.co/4U7yKOwkny
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 16, 2022
फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा
रविवारच्या सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी म्हणाले देवेंद्र फडणवीसांनी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता. केवढा विश्वास आहे बघा. मी लपवत नाही, आज माझं वजन 102 किलो आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा 128 किलो होतं. पण उद्धवजींना ही भाषा नाही समजत. त्यांना कळणाऱ्या भाषेत सांगतो की, सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल तर माझा 1.5 आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझा एफएसआय 2.5 होता. पण उद्धवजी तुम्हाला असं वाटतंय की माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी कराल. पण हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा की माननीय बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्यात मैद्याच्या पोत्याच्या पायाशी नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालाय. वजनदार लोकांच्या नादी लागू नका’, असा जोरदार पलटवार फडणवीस यांनी केला.