सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही म्हणणाऱ्या निरुपमांना भाजपने ‘उरी’ची तिकिटं पाठवली
मुंबई : सर्जिकल स्ट्राईक बोगस असल्याचा आरोप करणाऱ्या संजय निरुपम यांना मुंबई भाजपाच्या युवा मोर्चाने ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाची 10 तिकिटं पाठवली आहेत. इतकेच नाही, तर संजय निरुपम यांनी सिनेमा बघावा आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यावर देशाची माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली. 18 सप्टेंबर 2016 ला जम्मू-काश्मीर येथील भारतीय लष्कराच्या उरी बेस कॅम्पवर […]
मुंबई : सर्जिकल स्ट्राईक बोगस असल्याचा आरोप करणाऱ्या संजय निरुपम यांना मुंबई भाजपाच्या युवा मोर्चाने ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाची 10 तिकिटं पाठवली आहेत. इतकेच नाही, तर संजय निरुपम यांनी सिनेमा बघावा आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यावर देशाची माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली.
18 सप्टेंबर 2016 ला जम्मू-काश्मीर येथील भारतीय लष्कराच्या उरी बेस कॅम्पवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी रात्रीच्या वेळी हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात भारतीय लष्कराचे 19 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराच्या विशेष जवानांनी 29 सप्टेंबर 2016 ला पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. मात्र हा सर्जिकल स्ट्राईक बोगस असून याचा कुठलाही पुरावा नसल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पंतप्रधान मोदींवर केला होता. तर पाकिस्ताननेही असा कुठलाही सर्जिकल स्ट्राईक झाला नसल्याचं म्हटलं होतं.
मुंबई भाजपाच्या युवा मोर्चाचे महासचिव निखिल व्यास यांनी संजय निरुपम यांना ही तिकीट पाठवली, त्यासोबत त्यांना एक पत्रही लिहिले. या पत्रात त्यांनी लिहिले की, ‘भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर बनलेला हा सिनेमा बघून निरुपम यांनी देशाच्या जनतेची माफी मागावी.’
‘इतिहासात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशावरुन भारतीय लष्कराने 29 सप्टेंबर 2016 च्या रात्री सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर दिले. देशाच्या 125 कोटी जनतेने सर्जिकल स्ट्राईला मानलं आणि पंतप्रधानांच्या या निर्णयाचं कौतूक केलं. सपूर्ण जगाने मान्य केलं की, सर्जिकल स्ट्राईक झाला. मात्र जगातील एकमेव देश पाकिस्तान आणि जगातील एकमेव व्यक्ती संजय निरुपम यांनी म्हटले की, सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही’, असेही निखिल व्यास यांनी सांगितले.
सिनेमा बघितल्यानंतर संजय निरुपम यांनी देशाची माफी मागितली नाही, तर भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात प्रदर्शन करतील, असा इशाराही निखिल व्यास यांनी दिला.
‘उरी’ हा सिनेमा 11 जानेवारीला प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेता विकी कौशल, परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम हे मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत आहे.