भाजपाचे मिशन बारामती स्टार्ट, आज ‘हा’ मोठा नेता धडकणार
आम्ही अमेठी जिंकली तर बारामती जिंकायला काय अडचण, असा सवाल भाजप नेते राम शिंदेंनी पत्रकार परिषदेत केला आणि निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याची माहिती दिली.
योगेश बोरसे, पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) दृष्टीने भाजपने पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदार संघावर संपूर्ण शक्ती पणाला लावण्याची जोरदार तयारी भाजपने केल्याचं दिसून येतंय. या मिशन बारामतीची (Baramati) आजपासून सुरुवात होतेय, असं म्हटलं जातंय. कारण देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) आज पुणे दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून अर्थमंत्र्यांच्या बारामती दौऱ्याची चर्चा सुरु होती. आज अखेर त्या पुण्यात दाखल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्मला सीतारमण यांचा3 दिवस दौरा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक तसेच संघटनात्मक आढावा यावेळी घेतला जाईल. अर्थमंत्री या भूमिकेतून त्या कोणत्या मोठ्या घोषणा करणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय.
गेल्या अनेक वर्षांपासून बारमतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा, पवार घराण्याचा दबदबा आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे इथे खासदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यानाच तगडं आव्हान देण्यासाठी भाजपने सर्वशक्ती पणाला लावली आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्यावर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही प्रतिक्रिया विचारण्यात आली. मंगळवारी सुळे यांनी हे आव्हान मी सहज स्वीकारत असल्याचं म्हटलं. निर्मला सीतारमण बारामतीत आल्यानंतर त्यांना मी विनंती करते की, इथल्या अनेक संस्था त्यांनी पहाव्यात. कृषी विज्ञान केंद्र आणि इतर संस्था पहाव्यात. त्यांना वेश असेल तर मी फिरून त्यांना बारामती दाखवेन, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं.
कर्जत जामखेडचे माजी आमदार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी अर्थ मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात काल एक पत्रकार परिषद घेतली. निर्मला सीतारमण यांचा तीन दिवस बारामती दौरा असेल, असे त्यांनी सांगितलं. आम्ही अमेठी जिंकली तर बारामती जिंकायला काय अडचण, असा सवाल राम शिंदेंनी पत्रकार परिषदेत केला.
चंद्रशेखर बावनकुळेंची तयारी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण काही दिवसांपूर्वीच बारामतीत येण्याची शक्यता होती. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार तयारीही केली होती. बावनकुळे यांनी बारामतीचा दौराही केला होता. आम्ही बारामती लढणारच. निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाची. शरद पवारांनी इथं मोट बांधली असली किंवा कितीही प्रयत्न केले तरी देशाचे विश्वगुरू नरेंद्र मोदीच आहेत. भारताला मजबूत करण्याचं मोदींचं व्हिजन आहे, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं होतं.
बारामतीत कार्यक्रमांचा धडाका
बारामतीत निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्यात अनेक कार्यक्रम घेतले जातील. लोकसभा निवडणुकीपर्यंत बारामतीत 21 कार्यक्रम घेतले जातील, असं भाजपचं नियोजन आहे. त्यापैकी पहिल्याच कार्यक्रमासाठी थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना आमंत्रित करण्यात आलंय. त्यामुळे शऱद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी भाजपची जोरदार तयारी झाल्याचे दिसून येतेय.