देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं! शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल, किशोरी पेडणेकरांचं खोचक प्रत्युत्तर
आधीचे मुख्यमंत्री दिल्लीला सोनिया गांधींसमोर नतमस्तक होण्यासाठी जायचे, आताचे मुख्यमंत्री दिल्लीला विकासकामांची परवानगी आणण्यासाठी जातात, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. या टीकेला शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर आता भाजपनं मिशन मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) सुरु केलं आहे. मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फोडला. षण्मुखानंद सभागृहात बोलताना फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आधीचे मुख्यमंत्री दिल्लीला सोनिया गांधींसमोर नतमस्तक होण्यासाठी जायचे, आताचे मुख्यमंत्री दिल्लीला विकासकामांची परवानगी आणण्यासाठी जातात, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. या टीकेला शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्राला दिल्लीत 20 – 20 तास बसवून ठेवलं जातं, हे सर्वांना माहिती असल्याचा टोला पेडणेकर यांनी लगावलाय.
‘दिल्लीत महाराष्ट्राला 20 – 20 तास बसवून ठेवलं जातं’
फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पेडणेकर म्हणाल्या, घराणेशाही काय आहे हे पाहण्यासाठी भाजपनं स्वत:च्या पक्षातही डोकावून पाहावं. भष्ट्रचाराबाबत बोलण्याचा भाजपला अधिकार नाही. कारण, भाजपनं भ्रष्टाचाऱ्यांनाच पक्षात घेतलं आहे. दिल्लीत 20 – 20 तास महाराष्ट्राला बसवून ठेवलं जातं हे सगळ्यांना माहिती आहे. इतकंच नाही तर भाजपनं महापालिका निवडणुकीसाठी कुणासोबतही युती करावी, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यागाबाबत भाजप किंवा केसरकरांनी बोलू नये. गेल्या निवडणुकीत पहारेकरी वगैरे म्हणून भाजप स्वत:च सत्तेबाहेर बसली. शेलार, दरेकर स्वत:च्या भावाला निवडून आणू शकले नाहीत, असा टोलाही पेडणेकर यांनी लगावलाय.
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरुनही शिवसेनेला लक्ष्य केलं. त्याला प्रत्युत्तर देताना महापालिकेकडून खड्डे भरले जात आहेत. मात्र, एमएमआरडीएकडून व्यवस्थित काम होताना दिसत नाही, असा आरोपही किशोरी पेडणेकर यांनी केलाय.
भाजपचा महापौर तेव्हाच झाला असता – फडणवीस
भाजपच्या मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. मागच्यावेळीच आपण महापौर बसवू शकलो असतो. आपली तयारी झाली होती. पण मित्र पक्षासाठी दोन पावलं मागे गेलो आणि त्यांना महापौर बनवू दिला. आता आपलाच महापौर बसेल. शिवसेना-भाजप युतीचा महापौर बसेल. आपला भगवा महापालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही. आशिष तुम्ही क्रिकेट खेळणारे आहात आणि जाणाणारे आहात. त्यामुळे तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी कशी खेळायची आणि जिंकायची तुम्हाला माहीत आहे. हा सामना तुम्ही जिंकणारच आहात, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केलाय.
मागचा रेकॉर्ड मोडणार
एमसीएमध्ये शेलारांनी मुंबई प्रीमीयर लिग सुरू केली आहे. आता पालिकेत मुंबई महापालिका विकास लीग तयार करायची आहे. मध्ये एखादा फुटबॉल आला, अडथळा आला तर त्याला किक कशी मारायची हे तुम्हाला माहीत आहेत. तुम्ही दोरी उड्या असोसिएशनचे अध्यक्ष आहात. त्यामुळे कुणी कितीही उड्या मारल्या तरी त्याला किती उड्या मारू द्यायच्या हे तुम्हाला माहीत आहे. मागचा आपला स्ट्राईक रेट मोठा होता. आपण 35 वरून 80 जागांवर आलो. आता आपला स्ट्राईक रेट मागचा रेकॉर्ड मोडणारा असला पाहिजे याकडे आमची नजर आहे, असा इशाराच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.