BMC election 2022 Ward No 68 Sagar City Andheri : शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा ‘कांटे कि टक्कर’ होण्याची चिन्हे, वाचा वॉर्ड क्र. 68 मध्ये काय असेल चित्र
अंधेरी पश्चिमेकडील हायप्रोफाईल लोकवस्तींमधील एक प्रमुख वॉर्ड म्हणून वॉर्ड क्रमांक 68 कडे पहिले जाते. या वॉर्डात अमराठी मतदारांचा टक्का वाढलेला आहे. त्यामुळे या वॉर्डात राजकीय पक्षांना मराठी कार्डचा वापर करण्यासह अन्य मुद्द्यांना हात घालून मतदारांची मते जिंकावी लागणार आहेत.
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकी (BMC Election)ची रणधुमाळी सुरु झाली आहे. नवीन प्रभागरचनेनुसार आरक्षण सोडतही नुकतीच जाहीर झाली. त्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यंदाची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची ठरणार आहे. कारण राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबई महापालिकेची ही पहिली निवडणूक होत आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) या दोन पक्षांत सुरु असलेल्या ‘तू तू मै मै’चे पडसाद या निवडणुकीत उमटलेले दिसणार आहेत. वॉर्ड क्रमांक 68 मध्येही याच दोन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये ‘कांटे कि टक्कर’ पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीतही याच दोन पक्षांत कडवी लढत झाली आणि भाजपचे रोहन शशिंद्र राठोड यांना महापालिकेत वॉर्ड क्रमांक 68 चे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. राठोड यांनी तरुण नगरसेवक म्हणून महापालिकेत छाप पाडली. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात विकासकामांच्या माध्यमातून किती छाप पाडली हे येत्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या वाट्याला मिळणाऱ्या मतांच्या संख्येवरून स्पष्ट होणार आहे.
मागील निवडणुकीत कोणाला किती मते?
अंधेरी पश्चिमेकडील हायप्रोफाईल लोकवस्तींमधील एक प्रमुख वॉर्ड म्हणून वॉर्ड क्रमांक 68 कडे पहिले जाते. या वॉर्डात अमराठी मतदारांचा टक्का वाढलेला आहे. त्यामुळे या वॉर्डात राजकीय पक्षांना मराठी कार्डचा वापर करण्यासह अन्य मुद्द्यांना हात घालून मतदारांची मते जिंकावी लागणार आहेत. हेच तंत्र ओळखून मागील निवडणुकीत भाजपचे रोहन राठोड यांनी 8200 मते मिळवून विजयी पताका फडकावली होती. यावेळी शिवसेनेचे देवेंद्र उर्फ बाळा आंबेरकर यांनी 6226 मते मिळवून भाजपच्या राठोड यांना कडवी लढत दिली. मात्र राष्ट्रीय काँग्रेसचे इंद्रपाल सिंह (2157) आणि अपक्ष उमेदवार अभिजित विजय मेहता (2147) यांनी मोठ्या प्रमाणावर मते खाल्ली. रिंगणात उतरलेल्या 13 उमेदवारांमध्ये मतविभागणी झाली. त्यामुळे भाजपचे राठोड यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता.
एकूण मतदार
2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील नोंदीनुसार या मतदारसंघात एकूण 41756 मतदार आहेत. मागच्या निवडणुकीत या एकूण मतदारांपैकी 20327 मते वैध ठरली होती.
मतदारसंघातील समस्या
शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न वॉर्ड क्रमांक 67 साठी देखील चिंतेचा विषय आहे. रस्त्याशेजारी कचऱ्याचे ढीग महापालिकेच्या यंत्रणेकडून वेळेवर उचलले गेले नाही कि तो कचरा रस्त्यावर पसरतो. त्यामुळे प्राधान्याने कचरा व्यवस्थापन प्रश्न सोडवण्याची मागणी येथील मतदार करीत आहेत. त्याचबरोबर अतिक्रमणांमध्ये गायब झालेले फुटपाथ फेरीवालामुक्त करण्याची मागणीही स्थानिक रहिवाशांमधून केली जात आहे. चार बंगला मार्केट परिसरातील फुटपाथवर दुकानांचे अतिक्रमण आहे. या अतिक्रमणांवर तोडक कारवाई केली जाते. मात्र काही दिवसांनी पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण केले जाते. हे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणारा उमेदवार येथील मतदारांच्या पसंतीस उतरण्याची चिन्हे आहेत.