Budget Session : अभूतपू्र्व गोंधळानंतर महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला! कोणत्या विषयांवर चर्चा?
कालच्या गोंधळानंतर आज महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर गेलं. त्यावेळी विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलीय.
मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) गुरुवारपासून सुरु झालं. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या आमदारांनी दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ घातला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या अभिभाषणावेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे राज्यपाल महोदय अभिभाषण अर्धवट सोडून सभागृहातून बाहेर पडले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं. दरम्यान, कालच्या गोंधळानंतर आज महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर गेलं. त्यावेळी विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलीय.
विधानभवनात काल झालेल्या गोंधळानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अनिल परब, नाना पटोले, सतेज पाटील, हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर पोहोचले. अर्धा तासापेक्षा अधिक वेळ ही बैठक चालली. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलीय.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विनंती
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विषयावर राज्यपालांशी चर्चा झाली. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी परवानगी मिळावी ही विनंती राज्यपालांकडे केल्याची माहिती शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. 9 मार्च रोजी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी परवानगी मागितली. ती तारीख सोयीची वाटते. राज्यपाल याबाबत कळवतील, असं शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड करण्याबाबत तारीख निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव दि. २१ फेब्रुवारी २०२२ रोजी मा. मुख्यमंत्री कार्यालयामार्फत राज्यपाल महोदयांना सादर करण्यात आलेला आहे.
— NCP (@NCPspeaks) March 4, 2022
राज्यपालांशी सकारात्मक चर्चा – भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्यपालांशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्याकडूनही सकारात्मक उत्तर अपेक्षित आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये, असे भाजपचे प्रयत्न आहेत. यावरुन भाजपला आज उच्च न्यायालयानेही फटकारलं आहे. दरम्यान, विधान भवनातील कालच्या प्रकाराबाबत चर्चा झाली का? असा प्रश्न पत्रकारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारला. त्यावेळी राज्यपालांना जे झालं ते झालं, ते आता मागे टाका आणि विधान परिषदेच्या 12 आमदारांची फाईल क्लिअर करा, असं सांगितल्याचं पटोले म्हणाले.
इतर बातम्या :