10 राज्यांतील 54 विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणूक, मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष
10 राज्यातील एकूण 54 मतदारसंघांची पोटनिवडणुकही आज होत आहे. यात मध्य प्रदेशातील एकूण 28, गुजरातमधील 8, उत्तर प्रदेशमधील 7, ओडिशा, नागालँड, कर्नाटक आणि झारखंडमधील प्रत्येकी 2, तर छत्तीसगड, तेलंगाना आणि हरियाणातील प्रत्येक एका जागेसाठी मतदान पार पडत आहे.
मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. त्याचबरोबर 10 राज्यातील एकूण 54 मतदारसंघांची पोटनिवडणुकही आज होत आहे. यापैकी मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. (By-elections for 54 seats in 10- states,The country’s attention to the Madhya Pradesh by-election)
कोणत्या राज्यातील किती जागांसाठी मतदान?
मध्य प्रदेश विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एकूण 28 जागांसाठी मतदान पार पडत आहे. तर गुजरातमधील 8 आणि उत्तर प्रदेशमधील 7 जागांसाठी आज मतदान सुरु आहे. तिकडे ओडिशा, नागालँड, कर्नाटक आणि झारखंडमधील प्रत्येकी 2 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. तर छत्तीसगड, तेलंगाना आणि हरियाणातील प्रत्येक एका जागेसाठी मतदान सुरु आहे.
मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष
बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच मध्य प्रदेशात होत असलेल्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कारण ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम-राम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या 25 आमदारांनी राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. तर भाजपच्या आमदारांचे निधन झालेल्या ३ जागांचाही आजच्या पोटनिवडणुकीत समावेश करण्यात आला आहे.
या पोटनिवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. मध्यप्रदेशात सध्या भाजपकडे सध्या 107, काँग्रेसचे 87, बहुजन समाज पक्षाचे 2, तर समाजवादी पक्षाचा 1 आमदार आहे. तर 4 अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे बहुमताचा 116 हा आकडा गाठण्यासाठी भाजपला अजून ९ आमदारांची गरज आहे. तर काँग्रेसला बहुमत मिळवण्यासाठी 28 पैकी 28 जागा जिंकाव्या लागणार आहेत. त्यामुळे इथं भाजपचा विजय सुकर मानला जात आहे.
कमलनाथांच्या आक्षेपार्ह व्यक्तव्यांनी निवडणूक गाजली
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजप उमेदवार इमरती देवी यांना जाहीर सभेत आयटम संबोधल्यानं एकच राजकारण सुरु झालं होतं. कमलनाथांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचाही अगदी शेलक्या शब्दात समाचार घेतला. त्यामुळं निवडणूक आयोगानं त्यांचं काँग्रेसचे स्टार प्रचारक हे पद काढून घेतलं. पण सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाच्या आदेश रद्द ठरवला. त्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेची पोटनिवडणूक लक्ष्यवेधी ठरली आहे.
संबंधित बातम्या:
कमलनाथ काँग्रेसचे स्टार प्रचारकच राहणार!, निवडणूक आयोगाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
‘त्या’ वक्तव्यावरुन राहुल गांधींनी कमलनाथांना जाहीरपणे फटकारले, म्हणाले…
‘अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ’, ज्योतिरादित्य शिंदे यांचा कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल
By-elections for 54 seats in 10- states,The country’s attention to the Madhya Pradesh by-election