तानाजी सावंतांचं बीड, उस्मानाबादसाठी मोठं गिफ्ट, दसऱ्याच्या आधी मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा
या निर्णयामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा व उमरगा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला लाभ होणार आहे.
संतोष जाधव, उस्मानाबाद: उस्मानाबाद (Osmanabad) आणि बीड (Beed) जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. या प्रकल्पासाठीच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळाने घेतला आहे. या योजनेचा उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील 8 दुष्काळी तालुक्यांना फायदा होणार आहे.
मंत्रीमंडळाने 11 हजार 700 कोटीच्या कामांना जलसंपदा विभागाने मंजूर दिल्याने नवसंजीवनी मिळाली असून दुष्काळ मुक्ती होणार आहे. जून 2025 पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी सांगितलं. विजयादशमीच्या आदल्या दिवशी हा निर्णय झाल्यानंतर उस्मानाबादकरांनी आनंदोत्सव साजरा केला.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची कार्यवाही 2019 पासून शासनाकडे निर्णयार्थ आहे. यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अडचणी येत असल्याचं पत्र मंत्री सावंत यांनी दिलं होतं.
उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 133 गावांना याचा फायदा होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेऊन आदेश देण्याची मागणी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री डॉ सावंत यांच्या पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले आहे.
उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील 133 गावातील 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा गोदावरील मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळ, औरंगाबाद अंतर्गत उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्याच्या भागात प्रस्तावित आहे. प्रथम टप्प्यात 7 अघफू व दुसऱ्या टप्प्यात 16.66 अघफू असे एकूण 23.66 अघफू पाणी वापर आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा व उमरगा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला लाभ होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी उपसा सिंचन योजना क्रमांक एक व दोन तर बीड जिल्ह्यासाठी आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन उपसा सिंचन योजनेचा समावेश आहे. त्यातील सिंचन योजना क्रमांक एक व दोनमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश आहे.