सोनिया गांधी यांना कधीच माफ करू शकत नाही, माजी राष्ट्रपती यांच्या मुलीने सांगितली ती घटना
माझ्या बाबांवर त्यांच्या आयुष्यात तीन महिलांचा प्रभाव होता. ज्यात त्यांची आई, त्यांची पत्नी आणि इंदिरा गांधी यांचा समावेश आहे. इंदिरा गांधी माझ्या बाबांच्या गुरू होत्या. ते नेहमी म्हणायचे की आज मी ज्या पदावर आहे ते सर्व इंदिरा गांधींमुळे आहे.
नवी दिल्ली | 7 डिसेंबर 2023 : दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा हिचे ‘प्रणव, माय फादर : अ डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या पुस्तकात शर्मिष्ठा यांनी वडिलांचा हवाला देत अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्याच पुस्तकामध्ये त्यांनी एका घटनेबद्दलही सांगितले आहे. ज्यामुळे प्रणव दा हे सोनिया गांधी यांना कधीच माफ करू शकत नाहीत असेही या पुस्तकात शर्मिष्ठा यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारने प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार दिला. त्यावेळी गांधी परिवारातील एकही सदस्य उपस्थित नव्हते. याबाबत शर्मिष्ठा सांगतात की, जेव्हा मी बाबांना याबाबत विचारले, तुम्हाला वाईट वाटले नाही का? त्यावर त्यांनी जेव्हा नरसिंह राव यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात जाऊ दिले जात नव्हते तर माझ्या कार्यक्रमात गांधी परिवार उपस्थित नसणे ही कोणती मोठी गोष्ट आहे, असे ते म्हणाले होते अशी आठवण शर्मिष्ठा यांनी सांगितली.
वडील प्रणव मुखर्जी आणि माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे खूप जवळचे नाते होते. पण एक गोष्ट त्यांच्या मनात कायम राहिली. ती म्हणजे सोनिया गांधी यांनी नरसिंह राव यांचे पार्थिव त्यांच्या निधनानंतर AICC (काँग्रेस कार्यालय) मध्ये येऊ दिले नाही. बाबा या घटनेला अतिशय लज्जास्पद म्हणायचे. सोनिया गांधी आणि त्यांच्या मुलांसाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचे ते म्हणायचे असे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटलंय.
शर्मिष्ठा यांनी या पुस्तकात असा दावाही केला आहे की, गांधी परिवाराने नरसिंह राव यांना वाईट वागणूक दिली. माझे वडिलांनी याबाबत माझ्याशी अनेकदा बोलले. याचा उल्लेखही त्यांच्या डायरीत आहे. 2020 मध्ये नरसिंह राव यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इतक्या वर्षांनंतरही आता सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांना नरसिंह राव यांचे योगदान आठवत असल्याचे प्रणव दा म्हणाले होते. बाबा नेहमी म्हणत की गांधी कुटुंबाने नरसिंह राव यांना वाईट वागणूक दिली. यासाठी ते सोनिया गांधींना जबाबदार धरायचे. त्यामुळेच ते सोनिया गांधींना वैयक्तिकरित्या कधीच माफ करू शकले नाहीत असे शर्मिष्ठा यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
प्रणव दा यांच्या आयुष्यात तीन महिलांचा प्रभाव होता
या पुस्तकात शर्मिष्ठा म्हणतात, माझ्या बाबांवर त्यांच्या आयुष्यात तीन महिलांचा प्रभाव होता. ज्यात त्यांची आई, त्यांची पत्नी आणि इंदिरा गांधी यांचा समावेश आहे. इंदिरा गांधी माझ्या बाबांच्या गुरू होत्या. ते नेहमी म्हणायचे की आज मी ज्या पदावर आहे ते सर्व इंदिरा गांधींमुळे आहे. आणीबाणीच्या काळात ते त्यांच्यासोबत राहिले. ते म्हणायचे की मी काँग्रेस सोडणार नाही. त्यामुळे इंदिराजींना सोडण्याचा प्रश्नच येत नाही. इंदिरा गांधी यांच्या वाईट काळात मी त्यांची साथ सोडली तर जनता मला माफ करणार नाही, पण त्याहूनही अधिक मी स्वत:ला कधीच माफ करू शकणार नाही, असे ते सांगायचे असे शर्मिष्ठा म्हणाल्या आहेत.
राजीव गांधींनी बाबरी मशिदीचे कुलूप का उघडले?
शर्मिष्ठा यांनी पुस्तकात असा दावा केला आहे की, प्रणव मुखर्जींच्या म्हणण्यानुसार बाबरी मशीद पाडणे हा स्वातंत्र्यानंतर देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. शाहबानो प्रकरणावर कायदा झाल्यानंतर हिंदू मध्यमवर्गीयांमध्ये काँग्रेसची प्रतिमा खराब झाली. ही प्रतिमा सुधारण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी अयोध्येतील रामजन्मभूमीचे कुलूप उघडले होते असेही या पुस्तकात म्हटले आहे.