चंदीगड: कोणताही वादावादी न करता भाजपने गेल्या सहा महिन्यात पाच मुख्यमंत्री बदलले. मात्र, काँग्रेसला गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला पंजाबमधील वाद अद्यापही सोडवता आलेला नाही. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद थांबताना दिसत नाही. सिद्धू समर्थक 40 आमदारांनी चिठ्ठी लिहून नाराजी व्यक्त केल्यानंतर आता आज या आमदारांची बैठक होत आहे. आज संध्याकाळी 5 वाजता चंदीगडच्या सेक्टर 15 येथील काँग्रेस भवनमध्ये ही बैठक होत असल्याने या बैठकीत नेमकं काय होतंय, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. (captain amrinder singh chief minister post in danger)
पंजाबमधील 40 सिद्धू समर्थक मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री तृप्त राजेंद्र सिंग बाजवा यांच्या नेतृत्वात हायकमांडला चिठ्ठी लिहिली होती. त्यात लवकरात लवकर आमदारांची बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली होती. नवज्योतसिंग सिद्धू यांना साथ दिल्याने या आमदारांच्या मतदारसंघातील अधिकारी बदलण्यात आले. या मतदारसंघात नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून हे अधिकार या आमदारांचं ऐकत नाहीत. त्यामुळे हे आमदार नाराज आहेत. आमदारांनी या सर्व गोष्टी चिठ्ठीत लिहिल्या आहेत. तसेच केंद्रीय पर्यवेक्षकाच्या उपस्थित लवकरात लवकर आमदारांची बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी सोनिया गांधींकडे केली आहे.
शनिवारी बैठक घेण्यासाठी मोठ्याप्रमाणावर निवेदने आली होती, अशी माहिती पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी दिली आहे. हरीश रावत, अजय माकन आणि हरीश चौधरी आज संध्याकाळी चंदीगडला पोहोचणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माकन आणि चौधरी यांनी निरीक्षक म्हणून नियुक्त केलं आहे.
आमदारांची बैठक होणार असल्याचं कळताच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही आमदारांची बैठक बोलावली आहे. आमदारांच्या बैठकीत काँग्रेस हायकमांडकडून 18 सूत्री फॉर्म्युला मांडला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सिद्धू समर्थकांची भाषा आणि एकूणच बॉडी लँग्वेज पाहता अमरिंदर सिंग यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2022 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पंजाबात राजकीय वातावरण गरम आहे. त्यात पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी माजल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग विरूद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे थेट दोन गट पडले आहेत. सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षातच आव्हान दिलं आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून सिद्धू यांची वर्णी लावून काँग्रेस हायकमांडनेही सिद्धूच्या पारड्यात वजन टाकलं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नवज्योत सिद्धू हे काँग्रेसचा चेहरा असतील असं बोललं जात आहे.
पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवला आहे. हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला.
पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हायकमांडने या 25 आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं होतं. या सर्व आमदारांशी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या पॅनलने चर्चा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रंधवा आदींचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला काँग्रेसकडून आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करण्यास सुरुवात केली. परिणामी मुख्यमंत्री आणि या आमदारांमध्ये तणाव निर्माण झाला. (captain amrinder singh chief minister post in danger)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 18 September 2021 https://t.co/JFFzyAPU8P #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2021
संबंधित बातम्या:
नवज्योतसिंग सिद्धू उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी नकोच: मुख्यमंत्री अमरिंदर सिंग
अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू, पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान, नेमका वाद काय?
पंजाबमध्ये राजकीय भूकंप?, 25 आमदार दिल्लीत; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात मोर्चेबांधणी
(captain amrinder singh chief minister post in danger)