Chandrakant Patil : ‘शरद पवार भाजपला घाबरतात, एकट्याने लढण्याची हिंमत नाही’, चंद्रकांत पाटलांनी पुन्हा पवारांना डिवचलं
शरद पवार भाजपला घाबरतात. एकट्याने लढण्याची त्यांची हिंमत नाही. एकत्र लढूनही त्यांची फ्या फ्या होते हे कोल्हापूरला दाखवलं. ते एकत्र लढले तरीही त्यांना 96 हजार आणि आम्हाला 78 हजार मतं मिळाली. 9 हजार मतं अजून मिळाली असती तर जिंकलोच असतो, असं पाटील म्हणाले.
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) चंद्रकांतदादा थेट वार करतात. चंद्रकांत पाटील यांनी आता पुन्हा एकदा पवारांवर जोरदार निशाणा साधलाय. शरद पवार भाजपला घाबरतात. एकट्याने लढण्याची त्यांची हिंमत नाही. एकत्र लढूनही त्यांची फ्या फ्या होते हे कोल्हापूरला दाखवलं. ते एकत्र लढले तरीही त्यांना 96 हजार आणि आम्हाला 78 हजार मतं मिळाली. 9 हजार मतं अजून मिळाली असती तर जिंकलोच असतो, असं पाटील म्हणाले. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लिहिलेल्या पत्रावरुनही पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय.
राज ठाकरेंनी जे पत्र लिहिलं ते पत्र मी वाचलं, समर्पक आहे. कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. मात्र, महाविकास आघाडीचं वागणं आणि व्यवहार तसात दिसतो. याला उचल, त्याला पकड, खोट्या केसेस टाक आणि शेवटी महापालिका ताब्यात आहे म्हणून घराला नोटीस पाठव, असं सगळं चाललं आहे. मर्यादा नाही अशी दादागिरी सुरु आहे, असा गंभीर आरोपही पाटील यांनी केला आहे. पाटील पुढे म्हणाले की, NIA ने ज्या धाडी टाकल्या त्यात काय सापडलं काय माहिती. देशाविरोधात काय सुरु आहे हे शोधायला यांना वेळ नाही. मात्र, भोंगे उतरवण्याच्या प्रकरणात हजारो मनसे कार्यकर्त्यांना अटक करता. राज ठाकरे जे बोलत आहेत ते योग्य आहे. महाविकास आघाडी सरकार मुस्लिमांचं लांगुलचालन करत आहे.
भाजप खासदारांचा तो वैयक्तिक अजेंडा- पाटील
उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध केलाय. याबाबत विचारलं असता. राज ठाकरे यांच्या योग्य तो निर्णय घेतील. भाजप खासदारांचा तो वैयक्तिक अजेंडा आहे. राज ठाकरे यांनी बिहारी आणि उत्तर भारतीय लोकांबाबत त्या वेळी काय म्हटलं, त्यांच्याविषयी काय बोलायला हवं, जे काही ते म्हणाले त्याबद्दल ते अलीकडच्या सभांमध्ये बोलत आहेत. पण त्याबाबतचा निर्णय ते स्वत:च घेतील. देवेंद्र फडणवीस या विषयात जे काही करायचं ते करतील, असंही पाटील यावेळी म्हणाले.
फडणवीसांचाही ठाकरे सरकारवर निशाणा
या सरकारमध्ये यापेक्षा वेगळी अपेक्षाच त्यांनी ठेवायला नको होती. इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील असं मला वाटलं नव्हतं. जे सरकार लांगुलचालन करतंय. ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्या की हनुमान चालिसा म्हणायची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा खटला दाखल केला जातोय. खासदार आमदारांना 12 दिवस जेलमध्ये ठेवलं जातंय, त्यांच्याबाबत दुसरी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. मला असं वाटतं की या सरकारच्या विरोधात आम्ही तर लढतच आहोत, त्यांनीही लढलं पाहिजे, असा सल्लाही फडणवीस यांनी यावेळी राज ठाकरे यांना दिला आहे.