Chandrakant Patil : ‘चार महिने जेलमध्ये असणाऱ्या नवाब मलिकांचा राजीनामा घ्या’, चंद्रकांत पाटलांची मागणी; तर पवारांकडून मलिकांचं जोरदार समर्थन
'चार महिने जेलमध्ये असणाऱ्या नबाव मलिक यांचा राजीनामा घ्या. देश तोडू पाहणाऱ्या डी गँगशी यांचे संबंध आहे, असं दोषारोपपत्र दाखल झालं आहे. आता तरी राजीनामा घेणार की नाही? असा सवाल पाटील यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नबाव मलिकांचं जोरदार समर्थन केलंय.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचं आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. त्यानंतर भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केलीय. ‘चार महिने जेलमध्ये असणाऱ्या नबाव मलिक यांचा राजीनामा घ्या. देश तोडू पाहणाऱ्या डी गँगशी यांचे संबंध आहे, असं दोषारोपपत्र दाखल झालं आहे. आता तरी राजीनामा घेणार की नाही? असा सवाल पाटील यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नबाव मलिकांचं जोरदार समर्थन केलंय.
शरद पवार यांनी आज ब्राह्मण संघटनांसोबत चर्चा केली. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले की, मत नमूद केलं आहे, हा निर्णय नाही. फायनल डिसीजन येईल तेव्हा बोलू. माझी खात्री आहे, मलिकांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. ते चुकीच्या लोकांसोबत संबंध ठेवतील यावर माझा यत्किंचितही विश्वास नाही. माझ्यावरही असे आरोप केले. पण ज्यांनी आरोप केले त्यांनी सत्ता आल्यावर विधीमंडळात भाषण केलं. आम्ही विरोधक म्हणून आरोप करत होतो. त्यात काही तथ्य नव्हतं. विरोधाला विरोध म्हणून बोलत होतो. माझी खात्री आहे. जेव्हा चित्रं समोर येईल तेव्हा मलिक यांची स्थिती स्पष्ट होईल.
चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवरही निशाणा
चंद्रकांत पाटील यांनी शिवेसनेवरही जोरदार निशाणा साधला. फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून जिल्ह्याजिल्ह्यात केसेस दाखल करता. जामीन मिळू दिला जात नाही. मात्र, एकीकडे देश तोडू पाहणाऱ्या गँगशी संबंध असणाऱ्यांचा राजीनामा नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे की पवार प्रेरित शिवसेना आहे? पवार बोले शिवसेना चाले, असं चाललंय का? खुर्चीसाठी किती दिवस असं करणार? बाळासाहेबांचा वारसा काय संग्रहालयात ठेवणार का? अशी प्रश्नांची सरबत्तीच पाटील यांनी केलीय. बंड करुन उठा, आम्ही लगेच आमच्यासोबत या म्हणणार नाही. नाहीतर लगेच संजय राऊत बोलतील. मात्र आता नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, असंही पाटील म्हणाले.
दाऊदचा माणूस मंत्रिमंडळात कसा? – भातखळकर
नवाब मलिक हेच दाऊद आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता त्यावर बोललं पाहिजे. शरद पवार यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं पाहिजे. दाऊदचा माणूस असल्याचं सिद्ध झाल्यानंतरही मलिकांना मंत्रिमंडळात का ठेवलं? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला घेरलं आहे. दाऊदचा माणूस तरीही मंत्रिमंडळात कसा? असा सवालच अतुल भातखळकर यांनी केला आहे.