Chandrakant Patil : ‘सुप्रिया सुळे यांच्याविषयी ग्रामीण पद्धतीने बोललो, पराचा कावळा करु नका’, चंद्रकांत पाटलांचं टीकाकारांना प्रत्युत्तर, स्पष्टीकरण काय?
चंद्रकांत पाटील यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांनी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. सोशल मीडियावरही पाटील यांच्याविरोधात जोरदार टीका सुरु आहे. अशावेळी पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत ग्रामीण पद्धतीने बोललो, कुणीही पराचा कावळा करु नये, असं आवाहन केलं आहे.
मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बुधवारी भाजपने आक्रमक पवित्रा घेत मंत्रालयावर मोर्चा काढला. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही पाटील यांनी टीका केली. मात्र, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना पाटील यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. पाटील यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांनी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. सोशल मीडियावरही पाटील यांच्याविरोधात जोरदार टीका सुरु आहे. अशावेळी पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत ग्रामीण पद्धतीने बोललो, कुणीही पराचा कावळा करु नये, असं आवाहन केलं आहे.
‘महाविकास आघाडी सरकार तिहेरी चाचणी पूर्ण करून ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा मिळवत नाही याचा संताप व्यक्त करताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी ग्रामीण पद्धतीने बोललो. ज्या ओबीसी समाजाच्या प्रेमातून हा सात्विक संताप व्यक्त केला त्यांना त्यामुळे आनंदच झाला. यामध्ये सुप्रिया सुळे किंवा कोणत्याही महिलेचा अनादर करण्याचा मुद्दा नाही. आपण जे मत व्यक्त केले त्याबाबतीत पराचा कावळा करू नये’, असं पाटील म्हणाले.
सदानंद सुळे यांच्याकडून निषेध
दरम्यान, सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. ‘चंद्रकांत पाटील हे स्त्री द्वेषी आहेत. जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे, ती गृहिणी आहे, ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी सर्वच महिलांचा अपमान केलाय’, असं मत सदानंद सुळे यांनी व्यक्त केलंय.
सुप्रिया सुळे यांचं संयमी उत्तर
सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संयमीपणे उत्तर दिलंय. ‘आमचं सरकार दडपशाहीचं नाही. विरोधकांना तेही भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना असं वाटत असेल की त्यांनी माझ्या वक्तव्यावर बोलावं, तो त्यांचा अधिकार आहे, त्यात गैर काय, मी इतका काही त्याचा विचार करत नाही, त्यांना वाटलं म्हणून ते बोलले असतील’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचा इशारा
राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना सवाल केलाय. तुमचं मानसिक स्वास्थ बिघडलं आहे का वयोमानानं असं बोललायत? महिला ही स्वयंपाकघरात गेली तर अन्नपूर्णा असते आणि मसनात गेली तर महाकाली असते , तुमच्या सारख्या घाणेरड्या लोकांच्या विचाराचं मुंडन महाकाली केल्याशिवाय राहणार नाही, सुप्रिया सुळेंची माफी मागितल्याशिवाय पुण्यात पाय ठेवू देणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केलाय.
‘महिला तुमचं दुकान कधी उखडून टाकतील समजणारही नाही’
काँग्रेस नेत्या आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही चंद्रकांत दादांना चांगलंच सुनावलं. तुम्ही पुन्हा एकदा महिलांना स्वयंपाक घरात पाठवण्याच्या बाता करतायत. पण आता वेळी अशी आलीय की वहिनी कान्सला जातील आणि भाऊ-दादांना घरी स्वयंपाक करत बसावं लागेल. काळ बदललाय. महिलांना कमी लेखू नका. महिला तुमचं दुकान कधी उखडून टाकतील समजणारही नाही.