‘आमच्या कामावर अमित शाह समाधानी’, चंद्रकांत पाटलांकडून संघटनात्मक बदलांच्या चर्चेला पूर्णविराम
भाजपमध्ये मोठे बदल होण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, हा दिल्ली दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि संघटनावाढीबाबत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. आता चंद्रकांत पाटील यांनीही अमित शाह आमच्या कामावर समाधानी असल्याचं सांगत संघटनात्मक बदलांच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
पुणे : दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी घेतलेली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) भेट. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा दिल्ली दौरा आणि शाहांसोबत बैठक. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठे बदल होण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, हा दिल्ली दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि संघटनावाढीबाबत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. आता चंद्रकांत पाटील यांनीही अमित शाह आमच्या कामावर समाधानी असल्याचं सांगत संघटनात्मक बदलांच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
चंद्रकांत पाटील दिल्लीला गेले की सूत्र अपप्रचार करतात. ही सूत्र कोणती आहेत ते माहिती नाही. कारण, चंद्रकांत पाटील काय चीज आहे त्यांना माहिती नाही. मी घाबरणार नाही, असं पाटील टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले. केंद्रीय नेतृत्व नाराज नाही. आम्ही केलेल्या कामावर अमित शाह समाधानी आहेत. त्यांची आणि माझी बॉडीलॅग्वेज तरी बघा, असंही पाटील म्हणाले. तर अमित शाह तुमच्यावर नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला असता ते पाहायला मी समर्थ आहे, असं पाटील म्हणाले.
साखर उद्योग आणि राज्यातील सध्यस्थितीवर चर्चा
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्येही दोन तास चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. यावेळी पाटील यांनी शहा यांना भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली व त्यांचे मार्गदर्शन घेतले. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही पाटील यांनी शाह यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शाह आणि फडणवीस भेट
पाटील आणि शाहांच्या भेटीनंतर फडणवीस यांनीही अमित शाहांची दिल्लीत भेट घेतली. बऱ्याच कालावधीनंतर फडणवीस आणि शहा यांची भेट झाली. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यातही भाजपने विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रमोशन दिल्यानंतर या भेटीची अधिकच चर्चा सुरू होती. ही राजकीय भेट असल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी ही राजकीय भेट नसल्याचं स्पष्ट केलं. दिल्ली दौऱ्यावर आल्यानंतर आमच्या नेत्यांना आम्ही नेहमी भेटतो, त्यानुसार आताही भेटल्याचं ते फडणवीस म्हणाले होते.
इतर बातम्या :