‘पुरावे द्या, उत्तर देऊ’ राऊतांचं सोमय्यांना उत्तर! ‘हो ना, मग मारामाऱ्या कशाला करता’, पाटलांचा सवाल
Kirit Somaiya Latest News : संजय राऊत यांच्याविरोधात निशाणा साधताना चंद्रकात पाटील यांनी मारामाऱ्या कशाला करता, असा खरपूस सवाल उपस्थित केलाय. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना चॅलेंज केलं होतं.
पुणे : पुण्यात हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. किरीट सोमय्या (Kirit Somaiya Latest Updates) यांची गाडी शिवसैनिकांनी पुण्यात अडवली. यावेळी सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोमय्यांना धक्काबुक्कीदेखील झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खुद्द भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केला असल्याचा आरोप ट्वीट करत केलाय. तर दुसरीकडे सोमय्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या शिवसैनिकांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सडकून टीका केली आहे. सरकारचं काम हे कायद्याचं रक्षण करणं असतं, कायदा हातात घेणार हे सरकार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असा घणाघाती आरोप चंद्रकात पाटील यांनी यावेळी टीव्ही 9 मराठीशी (TV9 Marathi) बोलताना केलाय. आता जर कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला सरकारच जबाबदार राहिल, अशीही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसंच संजय राऊत यांनाही चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.
संजय राऊतांना टोला
संजय राऊत यांच्याविरोधात निशाणा साधताना चंद्रकात पाटील यांनी मारामाऱ्या कशाला करता, असा खरपूस सवाल उपस्थित केलाय. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना चॅलेंज केलं होतं. जर तुमच्याकडे पुरावे असतील, तर सिद्ध करा, असं राऊत म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी उपरोधिक टोला लगावत म्हटलंय की, ‘हो ना, मग मारामाऱ्या कशाला करता!’
दरम्यान, किरीट सोमय्यांवर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आम्ही रचनात्मक काम करणारे लोकं आहोत, त्यामुळे तक्रार दाखल करणारच असं देखील त्यांनी म्हटलंय.
I am attacked by Shivsena Gundas inside the premises of Pune Mahapalika@BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 5, 2022
नेमका किरीट सोमय्या यांचा आरोप काय आहे?
पुण्यातील जंबो कोविड सेंटर चालवण्याचे काम लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आलं होतं. कोविड सेंटर सुरू असताना त्यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापन कारणीभूत आहे, असा सोमय्यांचा आरोप आहे. लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेस ला या कामाचा अनुभव नसताना सेंटरचे कंत्राट देण्यात आले. तसंच या कामासाठी आवश्यक पात्रता तिकडे दुर्लक्ष करण्यात आलं. परिणामी रूग्णांचे मृत्यू झाले आणि इतर स्वरूपाचं नुकसान झालं, असा आरोप सोमय्यांनी केलाय.
लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेस सुजित पाटकर यांची कंपनी आहे. याप्रकरणी सरकार तसेच संबंधित यंत्रणा यांच्याकडून कामात कसूर झाल्याचे दिसत असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. त्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या हे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आले होते.
राऊतांची सोमवारी पत्रकार परिषद
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे. सोमवारी घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत आता राऊत सोमय्यांच्या आरोपांवर काय बोलतात, याकडे सगळ्यांची नजर लागली आहे.
मी सोमवारी दुपारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत आहे… जय महाराष्ट्र! pic.twitter.com/GZXjEkzHW1
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 5, 2022