अमितभाईंची कोल्हापूरच्या अंबाबाईवर श्रद्धा, कोल्हापूरच्या जावयासाठी कोल्हापूरच्या सुपुत्राची अंबाबाईकडे प्रार्थना
अमितभाईंच्या तब्येतीला लवकर आराम मिळो व ते त्यांच्या कामाच्या नेहेमीच्या झपाट्याने पुन्हा कार्यरत होवोत, अशी प्रार्थना चंद्रकांत पाटील यांनी केली
पुणे : “केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची कोल्हापूरच्या अंबाबाईवर श्रद्धा आहे. अमितभाईंच्या तब्येतीला लवकर आराम मिळो” असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अंबाबाईकडे प्रार्थना केली. (Chandrakant Patil wishes for speedy recovery of Amit Shah who tested Corona Positive)
“अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीमुळे मनामध्ये खूप चिंता निर्माण झाली. कोल्हापूरच्या अंबाबाईवर अमितभाईंचीही श्रद्धा आहे. आपण अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो की, अमितभाईंच्या तब्येतीला लवकर आराम मिळो व ते त्यांच्या कामाच्या नेहेमीच्या झपाट्याने पुन्हा कार्यरत होवोत.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोल्हापूर ही अमित शाह यांची सासुरवाडी. अमित शाह यांच्या पत्नी सोनल यांचे माहेर कोल्हापूरचे त्यामुळे शाह यांना कोल्हापूरचे जावई म्हणूनही संबोधले जाते. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांचा जन्म मुंबईचा असला तरी मूळगाव कोल्हापुरातील. त्यामुळे कोल्हापूरचा सुपुत्र अशीही पाटलांची ओळख.
हेही वाचा : जनतेला क्वारंटाईन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः क्वारंटाईन होणार का? काँग्रेसचा सवाल
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ 5 ऑगस्ट रोजी होत आहे. आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र सामूहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे” असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जनता आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.
“अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिर व्हावे यासाठी आपण जगलो. त्या राममंदिराची पायाभरणी मोदींच्या हस्ते होत आहे. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस एरवी आपण खूप धुमधडाक्यात साजरा केला असता पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी वैयक्तिक पातळीवर उत्सव साजरा करावा.” असे ते म्हणाले.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा दिवस म्हणजे घरात दिवाळी आहे, असे समजून खूप मोठ्या प्रमाणात साजरा करावा. आपल्या घरावर रोषणाई करावी, गुढी उभारावी, घरावर कंदिल लावावा, घरासमोर पणत्या लावाव्यात आणि रांगोळी काढावी. घरामध्ये सर्व कुटुंबियांच्या सोबत टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पाहावा.” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
“पाच ऑगस्टच्या समारंभाचा सामूहिक उत्सव टाळावा. सामूहिक उत्सव साजरा करणार असू तर त्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी. सामूहिक उत्सवामध्येसुद्धा कोरोनाचे भान ठेवावे. ढोलताशे आणि फटाके बिलकूल नकोत.” असे चंद्रकांतदादांनी बजावले.
एकाच दिवशी भाजपच्या 5 बड्या नेत्यांना कोरोना
भाजपच्या पाच बड्या नेत्यांना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करुन आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री कमला राणी वरुण यांचं कोरोनामुळे रविवारी निधन झालं.
संबंधित बातम्या :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण
उदयनराजे, आव्हाड ते आठवले, अमित शाहांच्या स्वास्थ्यासाठी दिग्गज नेत्यांची प्रार्थना
(Chandrakant Patil wishes for speedy recovery of Amit Shah who tested Corona Positive)