उद्धव ठाकरे तुमचा बाळ कुठे गेला? अजित पवारांची जी 20 बैठकीला दांडी का? भाजप नेत्याचा सवाल
देशाच्या हितासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जी 20 ची बैठक सोडून उद्धव ठाकरे आणि अजित दादा हे राजकीय बैठका घेत होते, अशी टीका करण्यात आली.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात नवी दिल्ली (New Delhi) येथे आयोजित जी 20 परिषदेसाठी देशभरातील महत्त्वाचे नेते आले. मात्र महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर होते. यावरून भाजप नेत्याने टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ देशाच्या हितासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जी 20 ची बैठक सोडून उद्धव ठाकरे आणि अजित दादा हे राजकीय बैठका घेत होते. उद्धव ठाकरे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिला आहात, उद्धवजी तुमचं बाळ कुठं गेलं? तुम्ही का उपस्थित राहिले नाहीत परिषदेला? अजित दादा तुम्ही उपमुख्यमंत्री राहिला आहात, तुम्हीही का उपस्थित राहिले नाही परिषदेला?
ठाकरे-पवार कुठे होते?
उद्धव ठाकरे, अजित पवार आणि महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक काल मुंबईत आयोजित करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक त्यांना नंतरही घेता आली असती, असा टोमणाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
जी 20 ही जगातील प्रगत आणि विकसनशील देशांची संघटना आहे. 2023 मधील या संघटनेच्या परिषदेचं यजमानपद भारताकडे आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षभरात अनेक बैठका होणार आहेत. बैठकांच्या आयोजनासंबंधीची एक बैठक नवी दिल्लीत काल पार पडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे-पवार यांच्या गैरहजेरीवरून टीका केली. ते म्हणाले, ‘ आज जी 20 बाबत बैठक होती ती देशासाठी भूषणावह आहे. बैठकीला देशातील अनेक मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि अनेक पक्षांचे अध्यक्ष उपस्थित होते. हा देशवासियांचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात 14 समिट बैठका होणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्याचे ब्रँडिंग होणार आहे. मी बैठकीला उपस्थित होतो त्या बैठकीत सादरीकरण करण्यात आलं..
निमंत्रण सगळ्यांनाच गेलं होतं. देशप्रेम विकासाच्या बाबतीत अनेक गोष्टी यामध्ये आहेत. बैठकीत अनुउपस्थित राहून त्यांना काय दाखवायचं होतं? हेच देशप्रेम आहे का ? हेच राज्याचे प्रेम आहे का ?
आम्ही मुख्यमंत्री झाल्यावर आता काही लोक घराबाहेर येत आहेत. बेळगावच्या बाबतीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका जाहीर केली आहे. बेळगावमध्येच काय देशाच्या कुठल्याही भागात कोणी कोणाला रोखू शकत नाही..
आमचे मंत्री मराठी बांधवांच्या पाठीशी उभा राहतील आम्हाला कोणी आक्रमकपणा आणि धाडस शिकवू नये, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
चार-पाच महिन्यात आम्ही जे निर्णय घेतले त्यामुळे काही जणांना धडकी भरली आहे आरोपांना उत्तर द्यायला आम्ही रिकामे नाहीत, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.