Mohit Kamboj: कंबोज पुराव्यांशिवाय बोलणार नाहीत, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई होणारच- चंद्रशेखर बावनकुळे
भ्रष्टाचार केला असेल कारवाई होणार, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीला सूचक इशारा दिला आहे.
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) सध्या राष्ट्रवादीवर निशाणा साधून आहेत. काल तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आजही त्यांनी दोन ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. “हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असं ट्विट करत कंबोज यांनी राष्ट्रवादी विरोधात रनशिंग फुंकलंय. त्यावर आता त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहित कंबोज पुराव्यांशिवाय बोलणार नाहीत. त्यांच्याकडे सबळ पुरावे असतील. त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं. भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई होणारच, असं बावनकुळे म्हणाले आहेत. “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे पुढे घडणाऱ्या घडामोडी कंबोज यांना आधीच कश्या माहिती होतात असा प्रश्न विचारला जातोय.
तिसरा नेता कोण?
मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण? असा प्रश्न चर्चेत आला आहे. राष्ट्रावादीतील काही नेत्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. खुद्द शरद पवार यांच्यासह अजित पवारांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही सीजे हाऊसमधील पुनर्बांधणी प्रकरणी चौकशी सुरू आहे. पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता राजकीय वर्तुळात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. कंबोज सुचवू पाहणारे ‘राष्ट्रवादीचे मोठे नेते’ प्रफुल्ल पटेलच असल्याची जोरदार चर्चा आहे.
विरोधकांची एकजूट
ज्यांची चौकशी होणार आहे, त्यांची नावं आधी भाजपचे नेते जाहीर करतात आणि मग तपास यंत्रणा कामाला लागतात, असा उलटा कारभार सुरु आहे,असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणालेत. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या कार्यालयातून चालवल्या जातात का? त्यांना आधीच सगळी माहिती कशी मिळते. सगळ्या तपास यंत्रणांवर भाजपचा वचक आहे, असं शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी म्हटलंय. मविआचा कुठलाही नेता भाजपच्या धमक्यांना घाबरत नाही. ईडी सरकारची उलटी गिनती सुरु झाली आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नान पटोले म्हणाले आहेत. ईडी आधी कुठे धाड ताकत असेल जर त्याला माहित असेल तर मग त्याची चौकशी झाली पाहिजे. असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही,असं मिटकरी म्हणालेत.